#OnionPrice : कांद्याची "लाली' वाढली...कुठे किती भावाने विकला कांदा?..वाचा 

onion price 3.jpg
onion price 3.jpg

नाशिक : अवकाळी पावसाच्या दणक्‍यात रोपांसह कांद्याचे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत कांदा उपलब्ध होत नसल्याने कांद्याच्या भावाची "लाली' वाढत चाललीय. सोलापूरमध्ये लाल कांदा सर्वाधिक 20 हजार रुपये क्विंटल भावाने विकला गेला. तसेच कांद्याचे आगार असलेल्या येवल्यात उन्हाळी कांद्याचा क्विंटलचा भाव 14 हजार 700, तर लाल कांद्याचे मुंगसेमध्ये 11 हजार 85 रुपये असा राहिला. 

सोलापूरमध्ये सर्वाधिक 20 हजार रुपये क्विंटलचा भाव 

कांद्याचा क्विंटलचा भाव 24 तासांत कोल्हापूरमध्ये दोन हजार, येवल्यात एक हजार 709, तर चांदवडमध्ये एक हजार 218 रुपयांनी वाढला. संगमनेरमध्ये 15 हजार, कोल्हापूरमध्ये 13 हजार, मुंबईत 13 हजार, पुण्यात 12 हजार 500, धुळ्यात 11 हजार, उमराणेमध्ये 13 हजार 501 रुपये क्विंटल भावाने आज कांद्याची विक्री झाली आहे. उन्हाळ कांद्याचा क्विंटलचा आजचा भाव रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे असून, (कंसात 4 डिसेंबर 2019 चा भाव दर्शवतो) ः चांदवड- नऊ हजार 500 (आठ हजार 500), कळवण- 13 हजार 810 (14 हजार 70), पिंपळगाव बसवंत- 14 हजार 91 (13 हजार 300), येवला- 14 हजार 700 (12 हजार 991), मुंगसे- 11 हजार (11 हजार 100), सटाणा- 13 हजार 500 (13 हजार 200). शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपला असल्याने लासलगाव बाजार समितीमध्ये या कांद्याची आवक बंद झाली आहे. केरळमध्ये 15 हजार रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री झाली आहे. 


लासलगावमध्ये लालचा उच्चांकी भाव 
लासलगाव बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याला उच्चांकी भाव मिळत आहे. 2015-16, 2017-18 ला डिसेंबरमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली नव्हती. 2015-16 मध्ये इथे डिसेंबरमध्ये चार लाख 39 हजार क्विंटल कांद्याची विक्री झाली होती. त्यास दोन हजार 460 रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. 2016-17 च्या डिसेंबरमध्ये आठ हजार 394 क्विंटल उन्हाळ कांदा 951 रुपये क्विंटल भावाने, तर चार लाख 26 हजार क्विंटल लाल कांदा सोळाशे रुपये क्विंटल भावाने विकला गेला. 2017-18 च्या डिसेंबरमध्ये सात लाख क्विंटल कांद्याला तीन हजार 800 रुपये क्विंटल असा भाव राहिला होता. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये 28 हजार 423 क्विंटल कांद्याची विक्री 566 रुपये क्विंटल, तर सव्वासात लाख क्विंटल लाल कांद्याची विक्री एक हजार रुपये क्विंटल या भावाने झाली. लासलगावमध्ये लाल कांद्याला आताच्या 2 डिसेंबरला चार हजार 519 क्विंटलला आठ हजार 401, 3 डिसेंबरला पाच हजार 684 क्विंटलला आठ हजार 991, बुधवारी (ता. 4) तीन हजार 300 क्विंटलला आठ हजार 812, तर आज दहा हजार 12 रुपये क्विंटल असा भाव होता. 

जानेवारीपर्यंत गगनाला भिडलेले राहतील भाव 
देशाला महिन्याला दहा लाख टन कांद्याची गरज भासते. तसेच सद्यःस्थितीत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा एक लाख 60 हजार टन इतका आहे. केंद्राने 22 नोव्हेंबरला इजिप्तमधून सहा हजार 90 टन कांद्याच्या आयातीचा करार केला असून, हा कांदा 10 डिसेंबरला पोचणे अपेक्षित आहे. तसेच 29 नोव्हेंबरला तुर्कस्थानमधून 11 हजार टन आयातीचा करार केला असून, हा कांदा जानेवारी 2020 मध्ये पोचेल. शिवाय तुर्कस्थानमधून चार हजार टनाची अधिकची मागणी नोंदविण्यात आली असून, हा कांदा जानेवारीच्या मध्याला पोचेल. असा सारा 21 हजार 90 टन कांदा उपलब्ध होणार असला, तरीही मागणीच्या तुलनेत सरकारची उपाययोजना पाहिल्यावर "दात कोरून पोट भरणे' या उक्तीगत असल्याचे दिसते. त्याचबरोबर जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असतील, हे स्पष्ट होते. 

हेही वाचा > PHOTO : 'तो' भेटत नव्हता...म्हणून गेले पंधरा दिवस घरचे तणावाखाली होते.. पण अचानक देवघरापाशी..

ढगाळ हवामानामुळे वाढली चिंता 
ढगाळ हवामानामुळे कांदा उत्पादकांच्या चिंता वाढल्या आहेत. अशा हवामानामध्ये पावसाने दणका दिल्यास कांद्याच्या नुकसानीबरोबर काढणी लांबण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचे शेती अभ्यासक दीपक चव्हाण यांनी म्हटले आहे. द्राक्षबागायतदार संघाच्या विभागीय हवामान अभ्यास केंद्रातर्फे शुक्रवार (ता. 6)पर्यंत ढगाळ हवामान राहण्याचा आणि वादळ कोकण-गोवामार्गे समुद्रात जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच 18 ते 20 डिसेंबरला ढगाळ हवामान राहण्याची आणि उरलेल्या कालावधीत 12 ते 14 अंश सेल्सिअस किमान व 15 जानेवारी 2020 नंतर पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी किमान तापमानाची शक्‍यता केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com