एकदा नव्हे तिसऱ्यांदा लाच घेतांना जेरबंद...वरिष्ठ पोलिस निरीक्षक सापडला जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

सातपूर पोलिसांनी तक्रारदाराचे स्कॉर्पिओ वाहन पकडले होते. न्यायालयाने ते सोडून देण्याचे आदेशही सातपूर पोलिसांना दिले होते. तक्रारदाराचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी तक्रारदाराकडे पोलिस चौकीचे बांधकाम करण्यासाठी दोन लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. यातील एक लाख 20 हजार रुपये घेतले होते. उर्वरित 50 हजार रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले होते.

नाशिक : नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला 22 हजारांची लाच घेताना जेरबंद केल्याच्या घटनेला 24 तास होत नाहीत, तोच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जाधव यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. शुक्रवारी (ता. 6) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सातपूर पोलिस ठाण्यात सापळा रचून ही कारवाई केली. जाधव यांच्यावर यापूर्वीही ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे. 

असे घडले...

सातपूर पोलिसांनी तक्रारदाराचे स्कॉर्पिओ वाहन पकडले होते. न्यायालयाने ते सोडून देण्याचे आदेशही सातपूर पोलिसांना दिले होते. तक्रारदाराचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे पोलिस चौकीचे बांधकाम करण्यासाठी दोन लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. यातील एक लाख 20 हजार रुपये घेतले होते. उर्वरित 50 हजार रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक  

पथकाने शहानिशा केल्यानंतर सापळा रचला आणि दुपारी सव्वाच्या सुमारास तक्रारदाराकडून 50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी सातपूर पोलिस ठाणे गाठत माहिती घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजय जाधव, पोलिस निरीक्षक सतीश भामरे, मृदुला नाईक, सपकाळे, कुशारे, डोंगरे, एकनाथ बाविस्कर, गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

जाधव तिसऱ्यांदा जेरबंद 
जाधव तिसऱ्यांदा लाच घेताना अडकले आहेत. यापूर्वी ठाण्यातील मुरबाड येथे 2001 मध्ये, तर विरार येथे 2009 मध्ये लाच घेताना जेरबंद झालेले आहेत. सातपूर पोलिस ठाण्यात मात्र वरिष्ठ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सहाय्यक निरीक्षकाला निवृत्तीच्या दिवशी हजार रुपयांची लाच घेताना, तर दोन वेगवेगळ्या घटनांत पोलिस शिपाई जेरबंद झाले आहेत. 

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

बचावासाठी दबावाचा प्रयत्न 
दरम्यान, जाधव यांनी पोलिस चौकीच्या कामासाठी मदतीची मागणी केली, असे म्हणत शहर पोलिसांकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर या कारवाईविरोधात दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु कोणत्याही प्रकारे पैसे मागणे हा लाचेचाच प्रकार आहे, तसेच पथकाकडे भक्कम पुरावे असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिसांचा दबाव झुगारून लावला. मात्र, पोलिस वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू होती.

हेही वाचा > शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....

हेही वाचा > PHOTO : एक नाही..दोन नाही..तर कित्येक महिलांचा नाथ "लखोबा लोखंडे"...अखेर झाला जेरबंद...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officer accept bribe in nashik marathi news