पक्षांतर्गत खदखद भाजपला नेणार कुठे?

bjp
bjpesakal

"पक्षांतर्गत सर्व काही आलबेल आहे, असे चित्र रंगविण्यात धुळे जिल्ह्यातील भाजपचे काही नेते, प्रमुख पदाधिकारी यशस्वी ठरत असले तरी पडद्यामागे गटबाजी, विकास कामांचे वाटप व निधीचा प्रश्‍न, विविध पदांवरून खदखद वाढत चालली आहे. पक्षांतर्गत वादामुळे गटबाजी ठळकपणे समोर येत आहे. या स्थितीत पक्षाला उतरती कळा लागू नये, असे निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटते.'' - निखिल सूर्यवंशी

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हुकुमत गाजविणाऱ्या भाजपमध्ये विविध कारणांमुळे निर्माण झालेली खदखद, गटबाजी या पक्षामध्ये होत चाललेले बदल अधोरेखित करीत आहे. यातून भाजपचे जुने निष्ठावंत आणि इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट निर्माण होत चालल्याचे दिसून येते. ती धुळे शहरात प्रथम महापौर, नंतर उपमहापौर, स्थायी समिती सभापती निवडीवरून ठळकपणे समोर आली. शिवाय मनपा क्षेत्रात विविध योजनेतील प्राप्त निधीतून कामे वाटप, कारभारासह प्रशासनावर नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पुरेसा अंकुश नसल्याने त्यांना स्वपक्षीय नगरसेवकांची वाढती नाराजी घालविणे जिकिरीचे होत चालल्याचे दिसते.

bjp
थकीत कर असलेल्या वाहनांचा ई-लिलाव

साक्रीत पक्ष प्रतिमेला तडा

साक्री पालिकेतही परिवर्तन घडविल्यानंतर भाजपने प्रथमच बहुमताने सत्ता हस्तगत केली. त्यावेळी काही प्रभावी कार्यकर्त्यांना विविध पदांवर वर्णी लावण्याचे शब्द दिले गेले. ते पाळले गेले नाहीत. यातूनच भाजपचे जिल्हा सरचिटणीस शैलेश आजगे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळाली नाही. या नाराजीतून त्यांनी काँग्रेस व इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या वर्चस्ववादी गटावर सोशल मीडियातून निशाणा साधला. त्यांचा रोख दहिते गटावर होता. या गटाने स्वीकृत नगरसेवकपद हुसकावून लावले, असा आजगे यांचा समज आहे. त्यामुळे त्यांनी साक्रीतील पांझरा-कान साखर कारखाना, दूध संघ, जिल्हा परिषदेतील पंधरा वर्षांची सत्ता आदींप्रश्‍नी गावोगावी सभा घेणार, अशा आशयाचे संदेश दहिते गटाचा नामोल्लेख न करता व्हायरल केले. यातून २२ मेस साक्री विश्रामगृहात आजगे व दहिते गटाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. त्यांनी परस्परांविरोधी गुन्हे दाखल केले. या घटनेत शिस्तप्रिय भाजपच्या प्रतिमेला काहीसा तडा गेल्याचे मानले जाते.

स्वीकृत पदावरून वाद

साक्री पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पक्षांतर्गत कलह झाले. यात पक्षाचे जुने प्रभावी नेते व काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मातब्बर नेत्यामध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीत रस्सीखेच झाली. सरतेशेवटी नव्याने भाजपमध्ये प्रवेशीत मातब्बर नेत्याची सरशी झाली आणि महिलेला स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळाली. यातून पक्षाचे जुने प्रभावी नेते नाराज झाले आणि त्याचे पडसाद पक्षांतर्गत शह- काटशहाच्या राजकारणातून धुळे महापालिकेतील उपमहापौरपदाच्या निवडीत उमटले. सुलवाडे- जामफळ सिंचन योजनेप्रश्‍नीही भाजपच्या काही नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. असे विविध घटनाक्रम पाहाता पक्षांतर्गत विविध टप्प्यावर निर्माण होत चाललेली खदखद, गटबाजी भाजपला कुठल्या दिशेला घेऊन जाईल? याची चिंता कार्यकर्त्यांना सतावते आहे.

bjp
BJP-MNS युतीबाबत भाजप नेत्यांच मोठं विधान म्हणाले, बेरजेचं..

अन्‌ साक्रीत वादावेळी निघाली बंदूक...

साक्री विश्रामगृहात भाजपच्या गटातटात झालेल्या हाणामारीनंतर दुसऱ्याच दिवशी २३ मेस पुन्हा पक्षाचे जुने नेते सुरेश पाटील यांच्यासह समर्थक आणि दहिते गटाच्या समर्थकांमध्ये टोकाची हमरीतुमरी झाली. त्यातच एक बंदूक निघाली आणि धाक निर्माण करण्यात आला. यातून दोन गटातील वाद किती विकोपाला गेले आहेत याची प्रचिती येते. साक्री तालुक्यात भाजपमधील जुने व काँग्रेसमधून आलेल्यांमध्ये गटबाजीतून उभी फूट पडल्याचे दिसून येते. शिवाय नेते सुरेश पाटील यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यास दहिते गट कारणीभूत असल्याचा त्यांचा समज आहे. या दुखणीची साक्रीतील वादाला किनार असल्याचे कार्यकर्ते सांगतात. सध्या दहिते गटाच्या विरोधातील कार्यकर्ते नेते सुरेश पाटील यांच्या गटात स्थिरावत असल्याचेही चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com