जळगाव : अपघातात मृत पावलेल्या कामगाराच्या अंत्यविधीस नालतगांचा नकार | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह दूध संघाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखलेले आंदोलनकर्ते

अपघातात मृत पावलेल्या कामगाराच्या अंत्यविधीस नालतगांचा नकार

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावलगत झालेल्या अपघातात मृत पावलेल्या जळगाव दूध संघाच्या कंत्राटी कामगाराच्या पत्नीस नोकरी, २५ लाखांची मदत व आईला पेन्शन देण्याच्या मागणीसाठी नालतगांनी अंत्यविधीस नकार दिला. मृतदेह दूध संघाच्या प्रवेशद्वारावर आणून नातलग आक्रमक झाले होते.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावलगत मालवाहू करणाऱ्या मोठ्या ट्रकच्या धडकेत दूधाच्या टँकरवरील पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. यात जळगाव जिल्हा दूध संघातील कंत्राटी कामगार धनराज सुरेश सोनार (वय ३७) याचाही समावेश आहे.

मृतदेह दूध संघाच्या गेटवर
या अपघातात धनराजचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर नातलग व मित्रपरिवाराने त्याच्या शिवाजीनगरातील घरी गर्दी केली. नातलग व मित्र संतप्त झाले होते. धनराजच्या पश्‍चात त्याची वृद्ध आई, गरोदर पत्नी, तसेच ५ व ८ वर्षांची अशा दोन्ही मुली असा परिवार आहे.
सायंकाळी मृतदेह जळगावला आणल्यानंतर नातलगांसह मित्र परिवाराने मृतदेह असलेली रुग्णवाहिका थेट दूध संघाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी केली. सुरक्षारक्षकाने त्यांना प्रवेशद्वारावरच अडवून धरले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने उदरनिर्वाह कसा होईल, यासाठी नातलगांनी विविध मागण्या मांडल्या.

हेही वाचा: घोडसगावजवळ अपघात; शुक्रवारची पहाट मजुरांसाठी बनली काळ

अंत्यविधीस नकार
या वेळी मृत धनराजची पत्नी, आई यांनी आक्रोश करून न्याय देण्याची मागणी केली. धनराजच्या नातलगांनी त्याच्या पत्नीस दूध संघात नोकरी द्यावी, आईला पेन्शन सुरू करावी व दोघी मुलींच्या नावाने २५ लाखांची रक्कम बँकेत जमा करावी, अशा मागण्या लावून धरल्या. मागण्या मान्य होत नाही, तोवर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

हेही वाचा: सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

फक्त नोकरी देऊ शकतो
दरम्यान, याबाबत मृत धनराजचे पुतणे हर्शल सोनार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या मागण्यांचा पुनरुच्चार केला. तसेच याबाबत कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. श्री. लिमये यांनी दूध संघावर संचालक मंडळ असते. या मागण्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून मगच निर्णय घेता येईल, असे सांगितले. पत्नीला नोकरी देण्याचे त्यांनी तत्वत: मान्य केल्याचेही सोनार म्हणाले. मात्र, अन्य मागण्या मान्य होत नाही, तोवर मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातलगांनी घेतला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. पोलिसांचाही त्याठिकाणी बंदोबस्त होता.

Web Title: Relatives Refused The Funeral Of Death Body Worker Killed In Road Accident In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top