अवकाशात दिसणार निसर्गाचा आविष्कार!... खगोलप्रेमींना अनुभवण्याची संधी

sky 1.jpg
sky 1.jpg

नाशिक : वर्षाला निरोप देतानाच कंकणाकृती सूर्यग्रहण अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळणार असून, गुरुवारी (ता.26) हे सूर्यग्रहण स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ ते अकरा या वेळेत पाहता येणार आहे. नाशिक शहरातून 72.14 टक्‍के ग्रहण दिसणार आहे. केरळ व तमिळनाडूत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. 

यापूर्वी 6 जानेवारी 2019 मध्ये सूर्यग्रहण बघायला मिळाले होते. त्यानंतर 16 जुलै 2019 ला खग्रास चंद्रग्रहणाची अनुभूती घेता आली. त्यानंतर यात कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. हे सूर्यग्रहण मंगळूर, कासारगोड, थालासेरी, कोझिकोडे, पलक्कड (केरळ) तसेच उटकमंड, कोइम्बतूर, इरोडे, करुर, दिन्डीगूल, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुदुकोत्ताई (तमिळनाडू) अशा दक्षिण भारतातील ठराविक भागातून, तर उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. उटीतून तब्बल तीन मिनिटे सात सेकंद कंकणाकृती स्थिती पाहता येईल. 

सूची छिद्र कॅमेरा वापरून अथवा बहिर्वक भिंग वापरूनच...

विज्ञान प्रबोधिनीतर्फे दिलेल्या माहितीनुसार उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहणे धोकादायक आहे. सूर्यापासून येणारी किरणे आपल्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा करू शकतात. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास ग्रहण अंधत्व होण्याची शक्‍यता असते. दुर्बिण अथवा टेलिस्कोपद्वारे सूर्याकडे बघणे अतिशय घातक असून, त्यामुळे कायमची दृष्टी गमावली जाऊ शकते. सूर्यग्रहण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पद्धतीने सुरक्षितरीत्या पाहता येऊ शकते. सूची छिद्र कॅमेरा वापरून अथवा बहिर्वक भिंग वापरून सूर्याची प्रतिमा कागदावर पाहता येऊ शकते. विज्ञान प्रबोधिनीतर्फे सूर्यग्रहण चष्मे उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे चैताली नेरकर यांनी कळविले आहे. 

सौर चष्म्यातून ग्रहण पाहा 
सौर चष्म्यातून ग्रहण पाहताना निसर्गाची अनुभूती घेण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे केले आहे. ग्रहण काळात उपवास करणे, अन्नग्रहण न करणे, अन्नपाणी टाकून देणे आदी अनावश्‍यक गोष्टी केल्या जातात. या सर्व अंधश्रद्धा असून, गैरसमज दूर करत लोकप्रबोधनासाठी विविध ठिकाणी सौर चष्म्यातून सूर्यग्रहणाचे विलोभनीय दर्शन मोफत घडविणार असल्याचे कळविले आहे. निसर्गाच्या आविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, राज्य पदाधिकारी प्रा. डॉ. सुदेश घोडेगाव, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुशील कुमार इंदवे, जिल्हा प्रधान सचिव ऍड. समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, प्रल्हाद मिस्त्री, नितीन बागूल, विजय खंडेराव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com