
Dhule Crime News : पत्नीच निघाली पतीची मारेकरी; पोलिसांनी उकलले खुनाचे रहस्य
Dhule News : मुलाचा खून झाला अशी फिर्याद बापाने दिली. मारेकऱ्यांची नावेही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी सुरु झाली; पण हा गुन्हा दिसतो तितका साधा नाही, कुठेतरी पाणी मुरतेय ही बाब सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांच्या लक्षात आली.
त्यांनी चक्रे फिरवली आणि स्वत: पत्नीनेच पतीचा खून केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला. (wife killing her husband police are also misguided system succeeded in unraveling shocking case in Sangvi Dhule News)
सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या झेंडेअंजनजवळचा पुट्यापाडा येथील रहिवासी सिग्रेट देवसिंह पावरा (वय ५६) याने शुक्रवारी (ता. २) पहाटे पोलिस ठाणे गाठले. आपला मुलगा रामदास पावरा याचा गुरूवारी (ता. १) सायंकाळी गहाण ठेवलेली वनजमीन सोडवण्याच्या वादातून मारहाण करुन खून झाल्याची माहिती त्याने दिली.
संशयितांची नावेही सांगितली. त्यावरुन पोलिसांनी गावातून मिथून पावरा, भाया पावरा व युवराज पावरा यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरु केली.
मात्र, त्यांच्या माहितीतून खुनात त्यांचा सहभाग निष्पन्न होत नव्हता. त्यामुळे सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांनी तपासाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला.
मृत रामदास पावरा याच्या कुटुंबाबत माहिती घेतांना त्यांना एक धक्कादायक बाब समजली. रामदासचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासून त्याची पत्नी सुनंदा तथा बेबीबाई पावरा बेपत्ता झाली होती.
तिचा शोध घेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक रवाना करण्यात आले. अखेर खैरखुटी (ता. शिरपूर) येथे तिचा शोध लागला.
तिला सांगवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सुरवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच तिने माहिती दिली. ती ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला.
म्हणून केला खून
सुनंदाचा पती रामदासला मद्याचे व्यसन होते. मद्यधुंद होऊन तो तिला नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत होता. या त्रासाला वैतागून तिने अखेर त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी सायंकाळी तिने पतीला स्वत:च भरपूर दारु पाजली. त्याच्या डोक्यावर लाटण्याने प्रहार करुन बेशुद्ध केले. घरातील दोरी घेऊन त्याचा गळा आवळला. तो मेल्याची खात्री झाल्यानंतर ती घरातून पळून केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खून झाल्यापासून अवघ्या काही तासांतच संशयिताचा शोध घेऊन अटक करीत गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी अंसाराम आगरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील, सुनील वसावे, कृष्णा पाटील, सहायक उपनिरीक्षक जयराज शिंदे, कैलास जाधव, हवालदार संजय सूर्यवंशी, गंगाधर सोनवणे, कैलास कोळी, खसावद, पोलिस नाईक अनिल शिरसाट, सुनील साळुंखे, योगेश मोरे, रोहिदास पावरा, संजय भोई, कृष्णा पावरा, इसरार फारुकी, अश्विनी चौधरी यांनी ही कामगिरी बजावली.