नागपुरात कोरोनाचा हाहाकार! आज तब्बल ४० जणांचा मृत्यू.. कोरोनाबळींचा एका दिवसातील उच्चांक 

40 corona patients are no more in nagpur today
40 corona patients are no more in nagpur today

नागपूर:  शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक कायम असून आज चाळीस कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात शहरातील ३६ तर ग्रामीणमधील चौघांचा समावेश आहे. एका दिवसांत कोरोनाने मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. आज ४५६ नव्या बाधितांची भर पडली असून यात शहरातील २६७ तर ग्रामीणमधील १८९ जणांचा समावेश आहे. वाढत्या मृत्यूंमुळे कोरोनाची दहशत निर्माण झाली असून अनेक प्रयत्नानंतरही यश मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरात सातत्याने कोरोनाबाधित आणि बळींचा आलेख वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाबळींच्या संख्येत दररोज वाढ होत असून बळींचे विक्रम होत आहेत. शुक्रवारी ४० बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या २६९ पर्यंत पोहोचली. नव्या ४५६ रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार ७४७ पर्यंत पोहोचली. 

शहरात कोरोनाबाधितांची संख्या आता सर्दी, खोकल्याच्या रुग्णांसारखी वाढत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा जीव अधिकच धोक्यात आला आहे. शहरात आज दिवसभरात ११६६ तर जिल्ह्यातून ८०२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ४५६ जणांच्या घशातील स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले.

कोरोनाचा नव्याने प्रादुर्भाव झाल्याचे निदान झालेल्यांपैकी मेयोतून ८८, अँटिजन रॅपिड टेस्टमधून ८४, मेडिकलमधून ७६, नीरीतून ७५, एम्समधून ६३, खासगीतून ४५ तर माफसूमधून २५ जणांच्या घशातील स्राव नमुन्यांमधून कोरोना झाल्याचे निदान झाले. कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये मेडिकलमध्ये उपचारादरम्यान दगावलेल्यांमध्ये नाईक तलाव परिसरातील १९ वर्षीय तरुणी, नंदनवन येथील ४८ वर्षीय महिला, चंदननगरातील १९ वर्षीय तरुण, खासगीतून स्थलांतरित करण्यात आलेल्या ६६ आणि ६९ वर्षीय २ महिला, ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

२५२ जणांची कोरोनावर मात

शुक्रवारी दिवसभरात २५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. विषाणूने शिरकाव केल्यापासून शहरातील २५८१ आणि जिल्ह्यातील १७५६ करोनाबाधित आजारमुक्त झाले आहेत. मात्र, दररोज ॲक्टीव्ह रुग्ण वाढत असल्याने कोरोनामुक्त होण्याचा टक्का पुन्हा ५५ वर घसरला. सद्यःस्थितीत ३१४१ सक्रिय रुग्ण विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यातील ३६७ मेडिकलमध्ये ३०७ आमदार निवास तर २५७ मेयोत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com