अमरावती जिल्ह्यातील वरुडचा कापूस नरखेडला, मोर्शीचा कापूस जलालखेडयाला, ही कसली कापूसकोंडी?

मनोज खुटाटे
Friday, 24 July 2020

अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्‍यातील शेतकरी नरखेड तालुक्‍यात रांगेत उभे राहून कापूस विकतो आहे. कापूस विकण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासकीय चुकांमुळे कापूसकोंडी निर्माण झाली आहे. ही कापूसकोंडी कृत्रिम आहे. नरखेड तालुक्‍यातील कापूस खरेदी झाल्याने आता अमरावती जिल्ह्यातील कापूस नरखेड तालुक्‍यात खरेदी करून आधार दिला जात आहे.

जलालखेडा(जि.नागपूर ) : एकीकडे शेतकऱ्यांनी कापूस पेरणी खरीप हंगामात केली आहे व आता त्याला शेतीत भरपूर काम असताना अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्‍यातील शेतकरी नरखेड तालुक्‍यात रांगेत उभे राहून कापूस विकतो आहे. कापूस विकण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासकीय चुकांमुळे कापूसकोंडी निर्माण झाली आहे. ही कापूसकोंडी कृत्रिम आहे. नरखेड तालुक्‍यातील कापूस खरेदी झाल्याने आता अमरावती जिल्ह्यातील कापूस नरखेड तालुक्‍यात खरेदी करून आधार दिला जात आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुडचा कापूस नरखेडला व मोर्शीचा कापूस जलालखेडाला शासकीय खरेदीसाठी येत आहे.

शंभर किलोमीटरचे अंतर कापावे लागते
अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्‍यातील शेतकरी100 किलोमीटर लांब अंतर असलेल्या जलालखेडा व नरखेड येथे कापूस विक्रीसाठी आणीत आहे. मोठ्या प्रमाणात आवक असल्यामुळे शेतकऱ्यांना कधी कधी दोन दिवसही कापूस विक्रीसाठी राहावे लागते. वरुड व मोर्शी येथे कापूस खरेदी सुरू आहे. पण ती संथगतीने असल्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी नरखेड तालुक्‍यातील जलालखेडा व मोगरा हे सेंटर देण्यात आले आहे. कापूस पणन महासंघ हा कापूस खरेदी करीत आहे. यासाठी नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत कापूस खरेदीस हिरवा कंदील दिल्यामुळे वरुड व मोर्शी तालुक्‍यातील कापूस खरेदी सुरू झाली आहे.

अधिक वाचा : भिवापूर वगळता अख्ख्या नागपूर जिल्हयाला झाला संसर्ग

खरेदी होतेय संथगतीने
यंदा कापूस खरेदी करण्यात प्रशासन माघारले आहे.त्याला कोरोनाचे संकट हे कारण असले तरी कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन गडगडल्याचे दिसून येत आहे. वरुड तालुल्याचा कापूस नरखेड तालुक्‍यातील मोगरा व मोर्शी तालुक्‍यातील कापूस नरखेड तालुक्‍यातील जलालखेडा येथे विकला जात आहे. वरुड व मोर्शी तालुक्‍यातील जिनिंग प्रेसिंगमध्ये असलेल्या संथगतीच्या खरेदीमुळे कापूसकोंडी निर्माण झाली. याचा फायदा व्यापारी व कापूस खरेदी करणारी यंत्रणा घेताना दिसत आहे. नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होत आहे. आजही हजारो शेतकऱ्यांच्या घरी कापूस साठवलेला आहे. हा प्रश्‍न खरे तर शासनाने प्राधान्यक्रमाने सोडवून शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे.

अधिक वाचा :पतीपत्नी कामावरून दुचाकीने जात होते घरी,परंतू रस्त्यात घडले भयंकर...

वाहतुकीसाठी येतो पाच ते दहा हजाराचा खर्च
वरुड तालुक्‍यातील काही गावांचे अंतर हे नरखेड तालुक्‍यातील मोगरापासून व मोर्शी तालुक्‍यातील गावांचे अंतर जलालखेडापासून100 किलोमीटर आहे. तेथे कापूस विक्रीला नेण्यासाठी वाहन भाड्याने करावे लागते. कापसाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना पाच ते दहा हजार रुपये खर्च येतो. दोन दिवस उपाशीपोटी राहावे लागते. त्याठिकाणी ग्रेडरने कापूस नाकारला की मग मागेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागतो. अशा प्रकारे शेतकरी नागवला जात आहे.

अधिक वाचा : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा कधी?

नरखेड तालुक्‍यातील दोन केंद्रावर कापूस खरेदी सुरू
सद्य:स्थितीत नरखेड तालुक्‍यातील "सीसीआय'च्या व कापूस पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावरील खरेदी संपलेली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी मोठी असल्यामुळे व त्या तालुक्‍यात खरेदीचा वेग संथ असल्यामुळे नरखेड तालुक्‍यातील जिनिंग उपलब्ध असून क्षमताही भरपूर असून शेडची व्यवस्था आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी नरखेड तालुक्‍यातील दोन केंद्रावर कापूस पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी शिरू आहे. यामुळे या दोन तालुक्‍यातील शेतकऱ्यांना जरी अंतर लांब पडत असले तरी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

...अन्यथा काळे फासू !
अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना विनंती करण्यात आली की जिल्हयातील कापूस जिल्ह्यातच खरेदी करावा, तरी मात्र प्रशासन सहकार्य करीत नसल्यामुळे शेतकरी जेरीस आला आहे. दीड महिन्यापासून कापूस पणन महासंघाने शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे दिले नाही. जर पुढे काही दिवसात शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही तर कापूस पणन महासंघाच्या अध्यक्षाला घेराव घालून काळे फासण्यात येईल.
डॉ.अनिल बोंडे
माजी कृषी मंत्री

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Amravati district, the cotton of Warud was given to Narkhed, the cotton of Morshi was given to Jalalkhed, what kind of cotton is this?