पालकांनो दहा महिने थांबलो, आता तरी शुल्क भरा; विनाअनुदानित सीबीएसई शाळांची हाक

CBSE schools are asking for fees to Parents in Nagpur Latest News
CBSE schools are asking for fees to Parents in Nagpur Latest News

नागपूर ः लॉकडाउननंतर मोठा काळ गेला आहे. मात्र, जुन्या आणि नव्या सत्राचे केवळ पंधरा ते वीस टक्केच पालकांनी विद्यार्थ्यांचे शुल्क भरले आहे. शाळांमध्ये असलेले शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च पैशाअभावी कसे भागवायचे हा मोठा प्रश्न असल्याने आता तरी पालकांनी शुल्क भरावे, अशी हाक विनाअनुदानित सीबीएसई शाळा समितीने दिली आहे.

गेल्या दहा महिन्यापासून राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले. यामध्ये अनेकांना आर्थिक फटका बसला. त्यातून पालकांना शुल्क भरता आले नाही. मात्र, शाळांनी याही काळात पालकांकडून शुल्काची वसुली केल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय त्यासाठी विविध प्रकारे त्यांना त्रास देण्यात येत असल्याचे बोलण्यात येत आहे. मात्र, हे साफ खोटं असून शाळांनी आतापर्यंत कुठल्याच प्रकारचे शुल्क मागितले नाही. शिवाय आतापर्यंत ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम केले आहे. 

यात प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, त्यांना लॅपटॉप आणि त्यासाठी लागणारे ब्रॉडबन्ड आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत, ते केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होय. विशेष म्हणजे त्यासाठी नियमित वर्ग घेण्यापेक्षाही जास्तीचा खर्च येत असल्याचे संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ. इंदरप्रितसिंग तुली यांनी सांगितले. शाळांनी इतके दिवस खूप कमावल्याचे आरोप होतात. मात्र, त्या पैशातूनच विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. 

विद्यार्थ्यांचे शिक्षण कुठेही थांबलेले नाही. आतापर्यंत काही शाळांमध्ये १५ ते २० तर काही शाळांमध्ये एक टक्काही शुल्क दिले नसल्याने आतातरी पालकांनी शुल्क भरावे अशी मागणी संघटनेच्या अध्यक्षा निरू कपाई यांनी केली. यावेळी सदस्य राजाभाऊ टांकसाळे, गंगाधरजी नाकाडे व पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेतर्फे राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

काही संघटनांकडून विरोध

शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कुठल्याच प्रकारची तक्रार नाही. त्यांच्या पाल्यांचे नियमित शिक्षण सुरू आहे. त्यामुळे पालक शुल्काचा भरणा करण्यास तयार आहेत. मात्र, काही संघटनांकडून त्याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी अद्याप शुल्क दिलेले नाही. त्यांना याउलट पालकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क देऊ नका असे सांगण्यात येत असल्याचे डॉ. इंदरप्रितसिंग तुली यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com