Video : चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा, फक्त सात दिवस आहे तुमच्याकडे; अन्यथा न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्‍यावर उतरू

Chandrahsekhar Bawankule says Otherwise, we will take to the streets to get justice Bhandara hospital fire news
Chandrahsekhar Bawankule says Otherwise, we will take to the streets to get justice Bhandara hospital fire news

भंडारा : अशी घटना घडल्यानंतर एखादा चपराशी, एखादी नर्स यांच्यावर कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु, दहा नवजात बालकांचा हकनाक जीव गेल्यानंतर वरिष्ठ अधिकारी जेलमध्ये गेले पाहिजे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी जेलमध्ये जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री, भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले, माहिती अधिकारात प्रश्‍न विचारला होता. त्याचे उत्तर असे आहे की, या रुग्णालयात फायर स्पिंकलर्स उपलब्ध नाहीत, स्मोक अलार्म नाहीत आणि याशिवाय अग्निशमन यंत्रणेसाठी लागणारे बरेचसे साहित्य नाही. त्यासाठीच ८ मे २०२० रोजी १ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले.

आरोग्य सहसंचालकांना मुंबईला पाठवण्यात आले. तात्काळ मंजुरी मिळणे अपेक्षित होते. कारण हा काही बगीचांचा प्रश्‍न नव्हता, तर जेथे गरीब लोकांचे उपचार होते, त्या रुग्णालयाचा प्रश्‍न होता. हायरिस्क असलेल्या आयसीयुमध्ये यंत्रणा उभारण्याचा प्रश्‍न होता. येवढ्या गंभीर विषयासाठी जर प्रस्ताव मागील वर्षीच दिला होता, तर सरकारने त्याला मान्यता का नाही दिली? की ही घटना घडण्याची वाट सरकार बघत होते, असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला.

आता चौकशी कुणाची करायची, हा प्रस्ताव संचालकांकडे आहे, सहसंचालकांकडे आहे की उपसंचालकांकडे आहे, याची चौकशी करणार का? दीड वर्षांपासून संबंधित लोक सांगताहेत की, येथे केव्हाही दुर्घटना घडू शकते. याहीपेक्षा गंभीर म्हणजे की रुग्णाचे नातेवाईक सांगत आहेत की, गेल्या आठ दिवसांपासून लाइटमध्ये फ्लक्चूएशन होत होते. एमसीबी, एससीबी, स्वीच सर्वच निकामी झालं की फ्लक्च्यूएश होतं आणि लोड वाढलं की वायर गरम होतात आणि वायर तापले की धूर होतो. त्यानंतर मग आग लागते. या रुग्णालयातील घटनाही अशीच घडली असण्याची पूर्ण शक्यता असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हृदय पिळवटून टाकणारी घटना

जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू होणे, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी आठ मे २०२० ला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. सरकारने त्याला वेळीच मंजुरी दिली असती, तर कदाचित आज समाजमन सुन्न करणारी ही घटना घडली नसती, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आम्ही रस्त्‍यावर उतरू

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सरकारने केली पाहिजे. यासाठी आम्ही सरकारला सात दिवसांचा वेळ दिला आहे. तोपर्यंतच वाट बघू, अन्यथा पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्‍यावर उतरू, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com