नागपुरातून भारतीय सैन्यदलाला मिळणार तब्बल १० लाख हातगोळ्यांचे बळ; भारतीय मजदूर संघाचा विरोध  

राजेश चरपे 
Wednesday, 21 October 2020

दुसऱ्या महायुद्धातील एम-३६ या प्रकारातील हातगोळ्यांची (मल्टिमोडल हॅण्डग्रेनेड) निर्मिती नागपूरची कंपनी करणार आहे. युद्धात शत्रूपासून बचाव करताना व आक्रमणादरम्यान हातगोळे अत्यंत महत्त्वाचे शस्त्र मानले जाते.

नागपूर ः केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत सैन्यदलासाठी नागपूरच्या एकॉनॉमिक्स एक्स्प्लोसिव्हज लिमिटेड या कंपनीला १० लाख हातगोळे तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. यासंबंधी संरक्षण मंत्रालयाची अधिग्रहण शाखा आणि ईईएल यांच्यात ४०२ कोटींचा करार करण्यात आला आहे. मात्र यास संघप्रणित भारतीय प्रतिरक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे.

दुसऱ्या महायुद्धातील एम-३६ या प्रकारातील हातगोळ्यांची (मल्टिमोडल हॅण्डग्रेनेड) निर्मिती नागपूरची कंपनी करणार आहे. युद्धात शत्रूपासून बचाव करताना व आक्रमणादरम्यान हातगोळे अत्यंत महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. पुढील दोन वर्षांत सैन्यदलाला १० लाख हातगोळ्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. भारतीय सैन्यदलाने अलीकडच्या काळात एम-३६ बनावटीच्या हातगोळ्यांची निर्मिती करण्याचे कंत्राट देणे बंद केल्याची माहिती आहे.

हेही वाचा - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास  

इतकेच नव्हे, तर भारतातच तयार होणारे हे नवे मल्टिमोडल हॅण्डग्रेनेड अत्यंत उपयुक्त व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाल्याने सैन्यदलाकडून याला पसंती मिळाल्याची माहिती आहे.

सर्व चाचण्या यशस्वी

हातगोळ्यांसाठी आवश्यक सर्व चाचण्या यशस्वी ठरल्याची माहिती आहे. यानुसार, हातगोळ्यांची पिन काढल्यानंतर किमान ३.५ सेकंदापूर्वी त्याचा स्फोट होणार नाही, तर स्फोट होण्यास ४.५ सेकंदाहून अधिक वेळ लागू नये याचीही काळजी घेण्यात आल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. त्याचबरोबर १५ वर्षे टिकू शकेल (शेल्फ लाइफ), असेही तंत्रज्ञान यात वापरण्यात आले आहे. तसेच नॉर्थ ॲलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनच्या (नाटो) सर्व मानकानुसारच ही निर्मिती आहे. ते अधिक काळ टिकावेत, यासाठी याची आयसोथर्मल मायक्रो कॅलोरीमेट्री याद्वारे चाचणी करण्यात आली आहे. पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

२०१९मध्ये मिळाला प्रस्ताव

कंपनीला हातगोळे तयार करण्याचे तंत्रज्ञान २०१६ मध्ये मिळाले. त्यानंतर सैन्यदल व डायरेक्टर जनरल ऑफ क्वालिटी ॲश्युरन्सच्या (डीजीक्यूए) मार्गदर्शनाखाली सर्वप्रकारच्या वातावरणात चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर कंपनीला २०१९मध्ये व्यावसायिक स्तरावर हे तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक - छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा असताता शून्य गुण कसे मिळणार, विद्यर्थिनी गेली हायकोर्टात

भामसंचा विरोध

आयुध निर्माणीत हातबॉम्ब बनवण्याची क्षमता असताना खाजगी कंपनीने कंत्राट देणे म्हणजे सरकारी कंपन्यांना संपवण्याचाच हा प्रयत्न असल्याची टीका भारतीय मजदूर संघ प्रणित प्रतिरक्षा मजदूर संघाने केली आहे. खासगी कंपनीला कंत्राट देण्यापूर्वी आयुध निर्माणीचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे होते. आम्ही उत्पादन करण्याची मागणी करीत असताना ही संधी खासगी कंपन्यांच्या देण्यात आली. एकीकडे आयुध निर्माणीच्या निगमीकरणाचा डाव रचायचा व दुसरीकडे त्यांच्या उत्पादन क्षमतेवर घाला घालण्याचा याला आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया भारतीय मजदूर संघ प्रणित भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने व्यक्त केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Company in nagpur get contract of making 10 lakh hand granades