राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवावर यंदा कोरोनाचं सावट; स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची प्रतीक्षा 

राजेश रामपूरकर 
Monday, 28 September 2020

कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करतच संघातर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात येईल. २५ ऑक्टोबरपर्यंत सरकार व स्थानिक प्रशासनातर्फे आणखी काय नव्या सूचना येतात, याची संघाकडून प्रतीक्षा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर: येथील रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात कोरोनाचे सावट आहे. प्रत्येक वर्षी हजारो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडणारा विजयादशमी उत्सव यावेळी नेमका कोणत्या स्वरूपात साजरा होतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  यंदा अनेक बदल अपेक्षित आहेत.

कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करतच संघातर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात येईल. २५ ऑक्टोबरपर्यंत सरकार व स्थानिक प्रशासनातर्फे आणखी काय नव्या सूचना येतात, याची संघाकडून प्रतीक्षा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एप्रिल ते जून महिन्यादरम्यान होणारे जवळपास ९० पेक्षा जास्त संघशिक्षा वर्ग आणि इतर सार्वजनिक आणि सामूहिक कार्यक्रम रद्द केले होते. यात बंगळूरू येथे आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचादेखील समावेश होता. आता विजयादशमी सोहळ्याचे आयोजन कसे होणार याबाबत स्वयंसेवकांकडूनदेखील विचारणा होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात संघाचे स्वयंसेवक पथसंचलन, योग व इतर प्रात्यक्षिके सादर करतात. तसेच या कार्यक्रमाला देशातील गणमान्य अतिथींचे भाषण आणि सरसंघचालकांचे मार्गदर्शन होते.

सरसंघचालक काय सांगतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असते. परंतु, यंदा कार्यक्रमात बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीतील नियमावलीनुसार जर कार्यक्रम झाला तर शंभराच्या आतच लोक उपस्थित राहतील व सरसंघचालक भाषण करतील. 

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 

त्याचबरोबर फेसमास्क, शारीरिक अंतर, सॅनिटाझरचा वापर आणि कोरोनासंदर्भातील इतर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून यंदाचा विजयादशमी कार्यक्रम आयोजित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion about the celebration of Vijayadashmi utsav of RSS in nagpur