टेकाडीत कॉंग्रेस शिवसेना आमने-सामने 

file photo
file photo

टेकाडी (जि.नागपूर) : जिल्हा परिषद सर्कलला चुरशीच्या लढाईत स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेली राजकीय पक्षाची सत्ता आणि अपक्ष सदस्यांचा कल याकडेदेखील जि. प. उमेदवारांनी नजरा रोखून धरलेल्या आहेत. जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत येणाऱ्या टेकाडी (को.ख.) आणि जुनीकामठी या दोन ग्रामपंचायतीवर भाजप तर कांद्री ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. शिवाय गेली सात वर्षे टेकाडी जिल्हा परिषद सर्कलवर कॉंग्रेसने शिवकुमार यादव यांच्या रूपात सत्ता रोखून धरली होती. विकासात्मक धोरणातून सर्कलमध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व कायम ठेवण्याची जबाबदारी रश्‍मी बर्वे यांच्या रूपात पक्षाने त्यांच्या खांद्यावर दिलेली आहे. 

विभाजित भाजपचे उमेदवारापुढे आव्हान 
भाजप, प्रहार, शिवसेना आणि कॉंग्रेस या राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गाव पातळीवर होणाऱ्या मतदान प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेली सत्ता महत्त्वाची भूमिका वठवत असल्याचे नाकारता येत नाही. गावातील छोटेखाणी राजकीय बैठकांना वेग आला आहे. कांद्री ग्रामपंचायतीवर सरपंच पदासह 13 जागा जिंकत कॉंग्रेस पक्षाने एक हाती सत्ता मिळवली होती. जिथे भाजपला चार सदस्यांवर संतुष्ट राहावे लागले होते. तिथेच टेकाडी ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाने सरपंचपदासह 7 जागा, कॉंग्रेसने 4, शिवसेनेने 2 तर अपक्षांच्या 4 जागा निवडून आल्या होत्या. राजकीय तडजोडीने अपक्षांना सोबत घेऊन भाजपने उपसरपंच बसविलेला होता. जुनीकामठी ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाने सरपंचासह 7 जागा जिंकल्या होत्या, तर कॉंग्रेसला 3 जागा काबीज करण्यात यश आले होते. या तिन्ही ग्रामपंचायतअंतर्गत शिवसेनेला टेकाडी येथील दोन जागा अपवाद सोडल्या तर कांद्री आणि जुनीकामठी येथून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीत धसका खावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत जरी शिवसेनेने अपक्ष उमेदवार म्हणून एकजुटीने ताकद दाखवलेली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे चित्र पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत वैशाली देवीया यांना कॉंग्रेसच्या रश्‍मी बर्वे यांना लढत देण्यासाठी तगड्या मेहनतीची गरज असल्याचे चित्र आहे. तिथेच टेकाडीच्या सरपंच सुनीता मेश्राम आणि कल्पना चहांदे या स्वतः भाजपकडून जि.प.साठी इच्छुक होत्या. पक्षाने तिकीट न दिल्याने दोघीही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपची विस्कळलेली फळी पाहता शालिनी बर्वे यांना बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांची समज काढण्याचे मोठे आव्हान असून प्रहारच्या विद्या पानतावणे यांच्या रूपात प्रहार संघटनेची राजकीय खेळी पाहता राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

स्थानिकांना का डावलले 

जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार म्हणून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार टेकाडी आणि कांद्री क्षेत्रातील आहेत. परंतु, प्रहार आणि कॉंग्रेस पक्षांनी सर्वसाधारण महिला पंचायत समितीसाठी जुनीकामठी येथील स्थानिकाला प्राधान्य दिले. तिथेच शिवसेना आणि भाजपने पंचायत समितीसाठी स्थानिकांना का डावलले असा सूर स्थानिक कार्यकर्त्यांनी उगारल्याची चर्चा आहे. अशात मतदारांचा कल वळविण्यात कोणता पक्ष वरचढ ठरतो, हे पाहण्यासारखे आहे. 

कुही तालुक्‍यात राष्ट्रवादीत "इनकमिंग' सुरूच 
कुही ः भाजपचे प्रमोद पांडुरंग जुमळे व माजी चिकना ग्रामपंचायत सदस्य व नामदेवराव लुटे, माजी सरपंच ग्रामपंचायत वडेगाव नवेगाव व भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अनिल देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष राजू राऊत तसेच भागेश्वर फेंडर, लीलाधर धनविजय, दहेगाव वेळगावचे सरपंच जितू गोंडाणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव आशीष आवळे व ग्रामपंचायत सदस्य पवन राऊत हे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com