Corona Vaccination : नागपुरात दुपारपर्यंत दोनशे आरोग्यसेवकांचे लसीकरण, डॉ. दीपांकर भिवगडेंना टोचली पहिली लस

राजेश प्रायकर
Saturday, 16 January 2021

एकूणच पाचही केंद्रातून जवळपास दोनशे आरोग्यसेवकांना लस देण्यात आली. लसीकरणानंतर काही वेळ चक्कर आल्यासारखं वाटले, असा अनुभव एका आरोग्यसेवकाने सांगितला. परंतु, त्यानंतर कुठलाही त्रास नसल्याची पुस्ती जोडली. 

नागपूर : शहरातील पाच केंद्रावर कोविड लसीकरण सुरू झाले असून महापालिकेच्या पाचपावली सुतिकागृह कोविड लसीकरण केंद्रात मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांना ०.५ मिलीची पहिली लस देण्यात आली. दुपारी दोन वाजेपर्यंत या कोविड लसीकरण केंद्रात ३६ जणांना लस देण्यात आली होती. एकूणच पाचही केंद्रातून जवळपास दोनशे आरोग्यसेवकांना लस देण्यात आली. लसीकरणानंतर काही वेळ चक्कर आल्यासारखं वाटले, असा अनुभव एका आरोग्यसेवकाने सांगितला. परंतु, त्यानंतर कुठलाही त्रास नसल्याची पुस्ती जोडली. 

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

महापालिकेच्या पाचपावली सुतिकागृह केंद्रातील कोविड लसीकरण केंद्रात आज सकाळी महापौर दयाशकंर तिवारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यासोबतच मेयो, मेडिकल, डागा रुग्णालय, एम्स या ठिकाणीही एकाचवेळी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालयातील केंद्रावर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांनी पहिली लस घेतली. यानंतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बाळकोटे-खंडाईत, नेताजी सुभाषचंद्र बोस नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा विवेकानंद मठपती, मातृत्व व बालकल्याण वैद्यकीय अधिकारी वैशाली मोहकर यांनी लस घेतली.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले

परिचारिका राजश्री फुले आणि रजनी मेश्राम यांनी आरोग्य सेवकांना लस दिली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले होते. अर्धा तासापर्यंत त्यांना कुठलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. लसीकरणानंतर डॉ. दीपांकर भिवगडे यांनी लसीकरणाचा अनुभव सुखद असल्याचे सांगितले. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवला नाही. ही लस घेण्यात कुठलाही धोका नसून ज्यांनी नोंदणी केली, त्यांनी कुठलीही भीती मनात न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. वैशाली मोहकर यांनी लसीकरणानंतर काहीही त्रास नसून कोविडपासून बचाव करण्यासाठी ही लस उपयुक्त असल्याचे सांगितले. लसीकरणाने आरोग्यसेवकांचा आत्मविश्वास नक्की वाढेल, असे त्या म्हणाल्या. डॉ. मंजुषा मठपती यांनी लसीकरणाचा कुठलाही विपरीत परिणाम नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना वॉरिअर्स म्हणून आम्ही ही लस सुरक्षित असून लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी. डॉ. संगीता बाळकोटे-खंडाईत यांनी फ्रंट लाईन वर्करने स्वत:हून समोर येऊन लसीकरण करायला हवे, असे नमुद केले.  

हेही वाचा - महिलांनो! यंदा वाणाचे ट्रेंड बदलले, हळदी-कुंकू लावताना स्पर्श टाळण्यासाठी हटके ट्रिक्स

आठवड्यातून चार दिवस लसीकरण -  
उद्‌घाटनानंतर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रत्येक केंद्रावर आठवड्यातून चार दिवस लसीकरण होणार असल्याचे सांगितले. प्रत्येक दिवशी प्रति केंद्र १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा राहणार आहे. २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccination starts in nagpur