मी तर एक "नकोशी'; आई, तू पण..! 

सतीश तुळस्कर 
रविवार, 19 जानेवारी 2020

अंधारातील "पाप' लपविण्यासाठी पोटच्या गोळ्यालाच कचऱ्यात फेकून देणाऱ्यांचीही समाजात उदाहरणं या ना त्या कारणाने पाहावयास मिळतात. 

उमरेड (जि.नागपूर) : "बेटी बचाओ, बेटी बढाओ' या अभियानातून मानसिक स्तरावर मुलगी आणि मुलातील भेद मिटविण्यासाठी शासनाने लोकसहभागातून जनजागृती निर्माण केली. परंतु समाजील भेद अजूनही कमी झाल्याचे दिसत नाही. अशातच अंधारातील "पाप' लपविण्यासाठी पोटच्या गोळ्यालाच कचऱ्यात फेकून देणाऱ्यांचीही समाजात उदाहरणं या ना त्या कारणाने पाहावयास मिळतात. 

हेही वाचाः  बंटी और बबली नंतर आता पिंकीही... 

नवनियुक्‍त सभापतींनी वाचविले प्राण 
शुक्रवारी झालेल्या पं. स. निवडीत रमेश किलनाके हे सर्वानुमते पं.स.चे सभापती म्हणून उमरेड पंचायत समितीवर विराजमान झाले. त्याबद्दल आदल्या दिवशी त्यांचा सत्कार, अभिनंदन झाले. दुसऱ्या दिवशी शनिवारी साडेसातच्या सुमारास मोहपा शिवारात कचऱ्यात दीड दिवसाची बालिका पडून असल्याचे त्यांना कुणीतरी सांगीतले. जि.प.च्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघालेले किलनाके यांनी लगेच मोहपा शिवाराकडे मोर्चा वळविला. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली होती. पुढे होऊन पाहतात तो काय, दीड दिवसाची निष्पाप बालिका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर केविलवाणी टाहो फोडत असल्याचे पाहून त्यांच्या हृदयाला पाझर फुटला. कोणीतरी निष्पाप बालिकेला बेवारस स्थितीत कुत्र्या-मांजराच्या स्वाधीन केलेले पाहताच त्यांनी हळुवारपणे नाजूक जिवाला हातात धरले. रात्रभर थंडीत कुडकुडत असल्याने बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना समजले. "ती'ला वाचविण्यासाठी त्यांनी उमरेड पोलिसांना कळविले आणि पोलिसांच्या येण्याची वाट न पाहता बीडीओंनी दिलेल्या शासकीय वाहनातून तिला उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्‍टरांनी तिला तातडीने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात "रेफर' करण्यास सांगितले. 

क्‍लिक करा : साहेबरावने झटकला पंजा अन फसला देशातील पहिला प्रयोग- वाचा 

अज्ञात मातेविरूद्‌ध गुन्हा 
पंचायत समितीचे सभापती किलनाके यांनी रुग्णवाहिकेतून तिला नागपूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. तिथे लगेच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्‍टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. यानिमित्ताने तिच्या अज्ञात मातेच्या ममतेलाच काळिमा फासला गेला. उमरेड पोलिसांनी तिच्या अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला असल्याची माहिती किलनाके यांनी दिली. 

क्‍लिक करा : हवालदार ! तू सुद्‌धा...लाखोचा गंडा आणि जेलचे वारे 

माणूसकी जपली 
शनिवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सभा होती. परंतु त्या कामापेक्षा मला त्या निष्पाप बालिकेचा जीव वाचविणे लाखपटीने महत्वाचे वाटले. म्हणून जिल्हा परिषदेच्या सभेला मी दांडी मारून माणुसकी जपली. 
रमेश किलनाके 
नवनियुक्‍त पं. स. सभापती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A day's "no-go" found in the trash;