उत्पादन घटल्याने तूरडाळ महागणार; हरभरा, शेंगदाणे, तेलाचे भाव कडाडले

Decreased production will make pulses more expensive
Decreased production will make pulses more expensive

नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्राहकांची बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. ग्राहकांची वर्दळ मंदावल्याने हरभरा डाळ, शेंगदाणे तेल वगळता सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत. महिन्याच्या अखेरीस येणारी होळी आणि एप्रिलमधील गुढीपाडव्यामुळे हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाववाढ झाली आहे. भाज्या स्वस्त असल्याने तूरडाळीची मागणी कमी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत. मात्र, तुरीचे उत्पादन कमी झाल्याने तूरडाळीच्या दरात विक्रमी वाढ होण्याचे संकेतही मिळू लागले आहेत. सोयाबीन तेलाचे भाव वाढल्याने शेंगदाणा तेलाचे भावही वधारलेले आहेत.

बाजारात हरभऱ्याची आवक कमी असून मागणीही कमी झालेली आहे. साठेबाज आणि वायदा बाजारात हरभऱ्याचे भाव अचानक वाढल्याने हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश मार्चच्या अखेरपर्यंत हरभऱ्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे.

सरकारने हरभऱ्याची खरेदी करू नये यासाठी साठेबाज सक्रिय झाले असून ते अधिक भाव देण्यासाठीही तयारीला लागलेले आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल २५०ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. यंदा हरभऱ्याचे उत्पादन ९०ते ९५ लाख टन होण्याची शक्यता आहे. हरभऱ्याचे भाव वाढलेले असल्याने डाळीच्या दरातही वाढ झालेली आहे. 

तुरीच्या डाळीची मागणी कमी असल्याने भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. त्यामुळे व्यापार प्रभावित झालेला आहे. बाजारात किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दराने तुरीला भाव मिळत आहे. त्याचाही परिणाम बाजारात जाणवू लागला आहे. या वर्षी देशात ३५.३७ लाख टन तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत विक्री ४२ लाख टनाची आहे.

यातील तुटीची पूर्तता तुरीची आयात करून करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, तुरीची आयात कमी असून सरकारकडे साठाही अपुरा असल्याने भविष्यात तूरडाळीचे भाव विक्रमी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तूरडाळ १०५ रुपये प्रति किलोवर पोहोचली असून ती लवकरच ११५ ते १२० च्या जवळपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाववाढीने नागरिक मेटाकुटीस

उडीद आणि मूग मोगरच्या दरात घसरण झालेली आहे. उन्हाळा येताच पापड व इतर वाळवण करण्यासाठी उडीद डाळीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी असल्याने तांदळाचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी असून त्याचे भाव वाढलेले असताना आता शेंगदाणे तेलाच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भाववाढीने मेटाकुटीला आलेला आहे. येत्या काही दिवसात भावात घसरण होण्याची शक्यताही कमीच आहे, असे किराणा व्यापारी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com