'लोकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाला नावे द्यावी, पण बाळासाहेबांच्या नावाला विरोध होणे अशोभनीय'

अतुल मेहेरे
Monday, 25 January 2021

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आम्ही कुठेही विरोध करत नाही. पक्ष म्हणून आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. पण प्रत्येक ठिकाणी मंत्र्यांनी कुठलीही सल्लामसलत न करता कोणत्याही प्रकल्पांना नावे घोषित करणे सुरू केले, असे फडणवीस म्हणाले.

नागपूर : गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे काम आम्ही सुरू करताना आम्ही पैसा दिला. त्यावेळी सर्व आदिवासी संघटना मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी मागणी केली होती की या प्रकल्पाला गोंडवाणा हे नाव द्या. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की काम पूर्ण झाल्यावरच त्याला नाव देता येते, त्यापूर्वी देता येत नाही. काम पूर्ण झाल्यावर हे नाव देता येईल. त्यानंतर सरकार बदललं आणि या सरकारने प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्याला आदिवासी संघटनांचा विरोध आहे. आदरणीय बाळासाहेबांच्या नावाला अशा प्रकारे विरोध होणे हे अशोभनीय आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज नागपूर येथे ते बोलत होते. 

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आम्ही कुठेही विरोध करत नाही. पक्ष म्हणून आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. पण प्रत्येक ठिकाणी मंत्र्यांनी कुठलीही सल्लामसलत न करता कोणत्याही प्रकल्पांना नावे घोषित करणे सुरू केले. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध होणे, हे नक्कीच शोभणारे नाही. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पांना नावे दिली गेली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनाही मी विनंती केली आहे आणि माध्यमांसमोरही बोललो आहे की, त्यांनी एक प्रोटोकॉल ठरवावा, जेणेकरून कुठे नाव देता येईल आणि कुठे देता येणार नाही, हे निश्‍चित झाले पाहिजे. त्यामुळे असा गोंधळ उडणार नाही आणि लोकांना रस्त्यावर उतरावे लागणार नाही, असे फडणवीस म्हणाले.   

हेही वाचा - डॉ. होमी जहॉंगीर भाभा पुण्यतिथी विशेष: भारताचे ‘लिओनार्दो दा विंची‘ बैठकीसाठी आले होते नागपुरात

सत्तापक्षाच्या नेत्यांचा धान घोटाळा -
धानाच्या व्यवहारात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते धनदांडग्यांनी लाटून नेले आहेत. बोगस माल एफसीआयला देण्यात येत आहे. मोठा धान घोटाळा सत्तापक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी मिळून केलेला आहे. त्यासाठी आजचा भंडाऱ्यात मोर्चा आहे. ज्याप्रमाणे वीज बिलाच्या संदर्भात या सरकारने जनतेशी बेईमानी केली आहे. त्या बेईमानीच्या विरोधात आजचा मोर्चा आहे. आधी अवाढव्य बिले पाठवली आणि आता वीज जोडणी कापू, असे सांगत जोडण्या कापणेही सुरू केले आहे, असे फडणवीस म्हणाले. 

हेही वाचा - मित्र एकमेकांच्या जीवावर उठले; मित्राचा खून केल्यानंतर विहिरीत फेकला मृतदेह

स्वस्थ बसणार नाही आणि सरकारलाही बसू देणार नाही -
एक भयानक घटना भंडाऱ्यात घडली. १० नवजात बालकांचा आगीने गुदमरून मृत्यू झाला. त्या घटनेच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे. आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. विजेचे बिलं कमी झाल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis commented on oppose to balasaheb thackeray name to gorewada zoo park in nagpur