सामाजिक कार्यकर्त्या म्हणाल्या, अंधाऱ्या रात्री दारू पार्ट्या अन् बाहेरची मुले तरुणींना छेडतात

Dirty and garbage everywhere in Abhyankar Nagar
Dirty and garbage everywhere in Abhyankar Nagar

नागपूर : शहरातील पॉश वस्त्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अभ्यंकरनगर परिसरात जागोजागी घाण व कचरा साचल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. प्रभागाच्या नगरसेविकेचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

उपराजधानीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र, अभ्यंकरनगरात ठिकठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग पाहून त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. अभ्यंकरननगरातील रस्ते, चौक व गल्लीबोळात जागोजागी घाण व कचरा साचला असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिसरात नियमितपणे स्वच्छता होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मुदलियार यांनी केला आहे.

केवळ अभ्यंकरनगरातच नव्हे, बाजूच्या माधवनगरातही हीच समस्या आहे. येथील मैदानावर साचलेल्या कचऱ्यात दिवसरात्र लहान मुले खेळत असतात. कोरोना दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

शिवाय परिसरातील मोकळ्या जागेवर अनेक ठिकाणी लाइट नाही. त्यामुळे अंधाऱ्या रात्री येथे दारू पार्ट्या रंगतात. अंधाराचा फायदा घेत बाहेरची मुले तरुणींना छेडतात. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे ज्योती यांनी सांगितले. 

दुर्गंधी व कचऱ्यासाठी येथील नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. अनेक लोक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर फेकून देतात. यासंदर्भात प्रभागाच्या नगरसेविका वर्षा ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्याउपरही मनपातर्फे नियमित स्वच्छता होत नाही. अनेक लोक घरातील कचरा रस्त्यावर फेकून देतात, असेही ज्योती म्हणाल्या.

छेडणाऱ्या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन करा
नगरसेविकेने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. परिसराची नियमित स्वच्छता व्हावी, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी तसेच तरुणींना छेडणाऱ्या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन करा.
- ज्योती मुदलियार,
सामाजिक कार्यकर्त्या

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com