शेतकरी झाले उद्‌ध्वस्त; निसर्गाचा लहरीपणा, बोंडअळीमुळे लावलेला खर्चही निघणे कठीण

Dramatic decline in cotton production at Nagpur rural
Dramatic decline in cotton production at Nagpur rural

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यात यंदा निसर्गाच्या लहरीपणा, बोंडअळी आणि बोंडसळीने कापूस शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले आहे. तब्बल २० हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आधीच विविध अडचणींत सापडलेले तालुक्यातील शेतकरी आता आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

नरखेड तालुक्यात मागील वर्षी शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी करावी लागणारी सर्कस व मिळालेला भाव पाहत अनेकांनी कापसाला ‘बाय बाय’ करीत सोयाबीनकडे कल वळविला होता. पण, सोयाबीननेही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता कापसावर टिकून होत्या. यंदा निसर्गाने शेतकऱ्यांची प्रतीक्षाच घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

सोयाबीनचे पीक अतिपावसामुळे हातातून गेल्यानंतर कापसावरच शेतकऱ्यांची आशा टिकून होती. मात्र, कापसालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनसह कापसाचे नुकसान केले. जास्त पावसाने कपाशीवर बोंडसड मोठ्या प्रमाणात आली होती. त्यात बोंडे खराब झालीत. त्यामुळेच पहिला बहार वाया गेला.

त्यानंतर काही प्रमाणात पहिल्या वेच्याचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला. दुसऱ्या फुलोऱ्यावर कपाशी असतानाच बोंडअळीचे आक्रमण झाले. यंदा मोठ्या प्रमाणात बोंडअळी आली. मात्र, कृषी विभागाकडून ज्या उपाययोजना सांगितल्या होत्या, त्या शेतकऱ्यांना करता आल्या नाही व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

नरखेड तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात २० हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. त्यामधील तब्बल सर्वच क्षेरातील कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडअळीने ९० टक्‍क्‍यांच्यावर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट सहन करावी लागली.

एकरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर पुढील वर्षाच्या नियोजनाचे आव्हान उभे झाले आहे. असे असताना आता शेतकऱ्यांकडून शासनाने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.

त्यांचे देखील दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या नुकसानीचे विमा कंपनीने सर्वेक्षण करून विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मदत देण्यासाठी गृहमंत्र्यांना भेटणार
यंदा सोयाबीन, कापूस व तूर या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. संत्रा व मोसंबीने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजनच कोलमडून टाकले. कापसावर बोंडसळ, बोंडअळीने आक्रमण केल्याने नुकसानाची पातळी वाढली आहे. या सर्व संकटांचा सामना करून शेतकरी शासनाकडे मदतीच्या आशेने पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे.
- वसंत चांडक,
माजी सभापती

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com