पदवीधर मतदारसंघ निवडणूक भाजपच्या अस्मितेची; ऑनलाईन संवादात नितीन गडकरी यांचे प्रतिपादन 

राजेश चरपे 
Saturday, 28 November 2020

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या विजयासाठी त्यांनी गुरुवारी (ता. २६) पूर्व विदर्भातील खासदार, आमदार यांच्यासह सुमारे चार हजार पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला.

नागपूर : वैचारिक मतभेद असतानाही केवळ भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन नागपूर पदवीधर मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता केवळ संदीप जोशी यांची नाही तर भारतीय जनता पक्षाच्या अस्मितेची आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून हा विजय सुकर करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या विजयासाठी त्यांनी गुरुवारी (ता. २६) पूर्व विदर्भातील खासदार, आमदार यांच्यासह सुमारे चार हजार पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी निवडणूक प्रमुख माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार महापौर संदीप जोशी उपस्थित होते.

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ना. नितीन गडकरी म्हणाले, नागपूरचे संदीप जोशी हे हाडाचे कार्यकर्ता आहेत. त्यांच्यात उत्तम संघटन कौशल्य आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक असो, स्थायी समिती सभापती असो की महापौर असो, त्यांनी प्रत्येक जबाबदारी चपखलपणे सांभाळली. त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती मोठी आहे. त्यांच्यासारखा उमेदवार निवडून येणे ही या मतदारसंघाची गरज आहे. 

संदीप जोशी यांनी निवडून येण्यासाठी ही निवडणूक प्रत्येकाने प्रतिष्ठेची बनवावी. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मला सुद्धा या मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली. या मतदारसंघावर भाजपच्या विचारांचा पगडा आहे. तो कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागायला हवी. 

सुमारे १०० ते १५० मतदारांशी प्रत्यक्ष आणि सुमारे २५० मतदारांशी फोनद्वारे संवाद प्रत्येकाने साधावा. पहिल्या पसंतीचे मत देताना गफलत होऊ नये यासाठी मतदान कसे करायचे, याची माहिती द्यावी. ‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ संपर्क होणे आवश्यक आहे. ही जबाबदारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

जाणून घ्या - पन्नासावर सुवर्णपदके जिंकून देणारी आंतरराष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टरला करावा लागतोय हा व्यवसाय

रविवारी पदवीधरांचा मेळावा

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, माजी खासदार दत्ता मेघे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात पदवीधरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of Graduate constituency is topic of pride for BJP said Nitin Gadkari