नागपूर ब्रेकिंग : कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी आढळले 54 रुग्ण, एकूणबाधित 680

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक 44 रुग्ण आढळून आले होते. यामुळे शहरच भयभीत झाले होते. कारण, इतक्‍या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ होती. तो दिवस उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी 43 कोरोना बाधित शहरात आढळले होते. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली होती. आता शुक्रवारी सर्वाधिक 54 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नागपूर :  मेडिकलच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या अमरावती येथील 65 वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. सोबतच मध्य प्रदेशातील सतना येथील 62 वर्षीय महिलेचादेखील कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. यामुळे शहरात मृतांची संख्या 13 झाली. शुक्रवारचा दिवस उजाडत नाही तोच तब्बल 54 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरात एकूण बाधितांची संख्या 680 वर पोहोचली.

यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक 44 रुग्ण आढळून आले होते. यामुळे शहरच भयभीत झाले होते. कारण, इतक्‍या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ होती. तो दिवस उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी 43 कोरोना बाधित शहरात आढळले होते. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली होती. आता शुक्रवारी सर्वाधिक 54 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

सविस्तर वाचा - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा...

अमरावती येथून तीन जून रोजी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात 65 वर्षीय वृद्धाला उपचारासाठी हलविले होते. ताप, सर्दी, खोकला तसेच श्‍वसनाचा गंभीर त्रास असल्याने तत्काळ व्हेंटिलेटरची गरज पडली. सारी आजार असल्याचे निदान झाले. परंतु, शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोविड चाचणी केली असता, कोरोनाबाधित असल्याचे निदान प्रयोगशाळेतून आले. उपचाराला दाद मिळत नसल्याचे आढळून आले. 4 जून रोजी पहाटे सव्वासहा वाजता त्यांचा श्‍वास कायमचा थांबला. 

हीच स्थिती मध्य प्रदेशातील सतना येथील महिलेची आहे. बुधवारी दाखल केल्याने 3 जून रोजी पहाटे पावणेसात वाजता या महिलेला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. लगेच गुरुवारी (ता.4) दुपारी 2 वाजता या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. आतापर्यंत शहरात झालेल्या 13 कोरोनाच्या मृतकांमध्ये तीन महिलांचा तर 10 पुरुषांचा समावेश आहे. 

चिंतेची बाब म्हणजे शहरातला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या बजाजनगरात पुन्हा कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे हा भाग सील करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी), एम्स आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) विषाणू प्रयोगशाळेतून 13 नमुने तपासले गेले. या प्रयोगशाळेतून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये लोकमान्य नगरसह गांधीबागेसह, टिमकी, भानखेडा आणि मोमिनपुरा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करून बरे झालेल्यांची संख्याही 412 झाली आहे.

जाणून घ्या - विचार जुळले, मन जुळले आणि ते झाले जीवनसाथी
सर्व वयोगटात कोरोनाचा संसर्ग

लहान मुलांना तसेच वयस्कांना सर्वाधिक कोरोना संसर्गाची जोखीम असल्याचे वैद्यक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र, शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 9 महिन्यांच्या चिमुकल्यापासून तर 73 वर्षे वयोगटातील वृद्ध व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. विशेष असे की, तरुण वयातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग केवळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना अधिक होतो, हा समजही यानिमित्ताने खोटा ठरला आहे. 

शहरातील कोरोनाचे मृत्यू

 • 5 एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 29 एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
 • 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
 • 11 मे रोजी पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा मृत्यू 
 • 16 मे रोजी गड्डीगोदाम येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
 • 17 मे रोजी शांतीनगर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 18 मे रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 25 मे रोजी मोमिनपुरा येथील 54 वर्षीय व्यक्ती 
 • 27 मे रोजी सतरंजीपुरा येथील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 39 मे रोजी रस्त्यावरचा भिक्षेकऱ्याचा मृत्यू 
 • 31 मे रोजी हिंगणा रोडवरील 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
 • 4 जून रोजी अमरावती येथील 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 4 जून रोजी मध्य प्रदेशातील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty four corona patients found in Nagpur on one day