‘ये शहर है गुन्हेगारो का... यहाँ पे सब अशांति-शांति है’; शहरात दिवसाढवळ्या गोळीबार

firing in Nagpur city
firing in Nagpur city

नागपूर : शहराची क्राईम कॅपिटलची ओळख पुसून काढल्याचा गृहविभागाचा दावा फोल ठरला आहे. बुधवारी रिंगरोडवरील आशीर्वादनगरमध्ये दिवसाढवळ्या युवकावर गोळीबार करण्यात आला. तीन दिवसांत उपराजधानीत चार हत्याकांड घडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उमेश ढोबळे (वय ३५, रा. सोमलवाडा) असे गोळीबारात गंभीर जखमीचे नाव आहे. त्याच्यावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. उमेश ढोबळे हा पालेभाजी विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी दुपारी साडेचार वजाताच्या सुमारास उमेश व दोन साथीदार (एमएच- ३१- एफएल -०२५५) या क्रमांकाच्या मोपेडने आशीर्वादनगरमधील बँक कॉलनी परिसरात आले. यादरम्यान उमेश याचा दोघांसोबत वाद झाला.

दोघांपैकी एकाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून उमेश याच्या डोक्याच्या दिशेने गोळी झाडली व दोघेही तेथून पसार झाले. यात उमेश जखमी झाला. गोळीबाराच्या आवाजाने नागरिक जमले. एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

माहिती मिळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमीला मेडिकलमध्ये दाखल केले.

मोपेडच्या क्रमांकावरून जखमीची ओळख पटली. उमेश हा बेशुद्ध आहे. तो शुद्धीवर आल्यानंतरच कुणी व कोणत्या कारणाने गोळीबार केला, याची माहिती मिळू शकेल. उमेश याच्या भावाकडून संशयितांची माहिती घेण्यात येत आहे, अशी माहिती सक्करदरा पोलिसांनी दिली.

दोघांसोबत झाला होता वाद

उमेश याचा एक महिन्यापूर्वी दीपक व राकेश या दोघांसोबत वाद झाला होता. हे प्रकरण बेलतरोडी पोलिसांपर्यंत पोहोचले होते. याप्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या वादातून हा गोळीबार करण्यात आला का याचा तपासही पोलिस करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजची मदत

आशीर्वादनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिस तपासत आहेत. फुटेजवरून तपासासाठी काही धागा मिळतो का? याची खबरदारी पोलिस घेत आहेत. तसेच त्यादरम्यान रस्त्यावरील दुकानदार आणि विक्रेत्यांच्या मदतीने आरोपींबाबत पोलिस माहिती काढत आहेत.

खून, घरफोड्या वाढल्या

काही दिवसांत शहरात खून, प्राणघातक हल्ले, गुंडांमध्ये गॅंगवॉर आणि चोऱ्या-घरफोड्या वाढल्या आहेत. तीन दिवसांत चार हत्याकांड उपराजधानीत घडले आहेत. गृहमंत्री देशमुख यांच्या ‘होमटाऊन’मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com