'झोपडी गेली, वावर गेलं; मी पण पुरातच मेलो असतो तर बरं झालं असतं'

संदीप गौरखेडे
Saturday, 14 November 2020

पूर ओसरून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. मात्र, शासनाचा कोणी अधिकारी अथवा नेता या गावात फिरकला नाही. मोहखेडी गाव पूर्णपणे पाण्याने वेढले होते. गावाचा संपर्क तुटला होता. दोन फूट पाणी वाढले असते तर संपूर्ण गाव बुडाले असते.

कोदामेंढी (जि. नागपूर) :  "मी तर मराचीच बाकी होती, मले बाहेर काढलं. शाळेत नेऊन फेकलं. एकटीच खातो. खावापुरतं काढलं, बाकी माती झाली, इथवरी पाणी होतं. माह्या महिना लटकला आहे. मले उचलून कुठेही फेकून द्या. पुरातच मेलो असतो तर बरं झालं असतं", डोळ्यात अश्रू आणि रडत्या स्वरात पूरपीडित कांताबाई पारधी आपली व्यथा सांगत होत्या. एकीकडे संपूर्ण देशभर दिवाळीचा आनंद साजरा होत असताना पूरपीडितांच्या डोळ्यांतील अश्रू अद्याप थांबलेले नाहीत. अजूनही ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

हेही वाचा - Diwali Festival 2020 : लक्ष्मी मातेचे पहिले चित्र काढणारा चित्रकार आहे तरी कोण?

पूर ओसरून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. मात्र, शासनाचा कोणी अधिकारी अथवा नेता या गावात फिरकला नाही. मोहखेडी गाव पूर्णपणे पाण्याने वेढले होते. गावाचा संपर्क तुटला होता. दोन फूट पाणी वाढले असते तर संपूर्ण गाव बुडाले असते. शून्यवजा झोपडीची दुरुस्ती करीत, पूर कधी सांगून येत नाही. दोनदा झोपड्या वाहून गेल्या. त्याबरोबरच दाणापाणी वाहून गेल्याने अठराविश्व दारिद्र्य अंगाशी कवटाळून जगतो. मात्र, ही झळ केव्हापर्यंत सोसायची, हा अनुत्तरित प्रश्न येथील रहिवासी विचारतात. पूर कधीही येतो, सर्वस्व नेतो, ही भीती येथील रहिवाशांना आहे. 

हेही वाचा - घरी सुरू होती दिवाळीची तयारी अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली

दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पावसामुळे शेतपिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. पंधरा झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. साहेबराव पारधी, राजू पारधी, कांताबाई पारधी आणि शीलाबाई लायटिये यांची घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पूरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था शाळेत केली. मात्र, कुठवर तिथे राहायचे, हा प्रश्न आहे. शाळा सुरू झाल्यास पुन्हा फजिती. शासनाकडून घर बांधकामासाठी काहीच मिळाले नाही. आणखी किती दिवस बाहेर संसार करायचा. पाच हजार कुठवर पुरणार, असा सवाल येथील पूरपीडितांचा आहे. येथील पूरपीडित शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पुढील पीक पेरण्यासाठी बियाणे नाही. गावाचे पुनर्वसन व्हावे याकरिता १९९४ ते २०१३ पासून लढा सुरू असल्याचे येथील एकाने सांगितले. 

हेही वाचा - वीज वितरण कंपनीकडून पुरवठाच नाही, बागायतदार शेतकऱ्यांवर कोरडवाहू शेती करण्याची वेळ

तहसीलदारांकडे वाऱ्या केला, पण फायदा नाही 
घराची सोय करून द्या. तहसीलदारांकडे हजार वाऱ्या केल्या पण त्यांना दया आली नाही. आम्हाला पैसे नको. पुरापासून बचाव व्हावा म्हणून जागा पाहिजे, आमचे पुनर्वसन करून द्या. गावाच्या भोवताल पाणी होते. मरण आलं असतं. कसेबसे लेकरंबाळ घेऊन रोडवर उभे होतो. कसेबसे जीव वाचविले. दोन महिन्यांपासून दुसरीकडे राहतो. घर बांधण्याची लायकी नाही, असे शीलाबाई लायटिये यांनी सांगितले. 

हेही वाचा - नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई

पूरपीडितांना अन्नधान्याची किट वाटप केली. प्रशासनाला सांगून तत्काळ पंचनामे करायला सांगितले. पूरग्रस्तांना दोन टप्प्यात पाच पाच हजारांची मदत मिळाली. उर्वरितांचा शोध घेऊन त्यांनाही मदत मिळवून देता येईल. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून, त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या मदतीसाठी प्रत्नरत आहे. 
-शालिनी शेषराव देशमुख, जि. प. सदस्या 

दृष्टिक्षेपात - 
गाव : मोहखेडी 
एकूण पडझड : ११ घरे 
शेतपिकांचे नुकसान : १४६.१० हेक्टर आर. क्षेत्रफळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood affected people from kodamendhi still wait for government help