esakal | घरी सुरू होती दिवाळीची तयारी अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली
sakal

बोलून बातमी शोधा

 katol soldier bhusan satai martyr at india Pakistan border

दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरेज सेक्टरमध्ये भूषण कर्तव्य बजावत होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये तीन सामान्य नागरिकांसह आठ भारतीय जवानांना वीरमरण आले.

घरी सुरू होती दिवाळीची तयारी अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर - श्रीनगरमधील गुरेज सेक्टर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारे जवान भूषण सतई यांना वीरमरण आले आहे. घरी दिवाळीची तयारी सुरू होती अन् ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला जवानाच्या वीरमरणाची बातमी समजली. त्यामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले असून ते केवळ २८ वर्षांचे होते. 

भूषण सतई यांनी महाविद्यालयात असतानाच सैन्यात भर्ती होण्यासाठी तयारी केली होती. ते वयाच्या वीसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरेज सेक्टरमध्ये भूषण कर्तव्य बजावत होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये तीन सामान्य नागरिकांसह आठ भारतीय जवानांना वीरमरण आले. यामध्ये भूषण सतई यांचाही समावेश आहे. त्यांचे पार्थिव शनिवारी नागपूर विमानतळावर आणले जाईल. त्यानंतर वाहनाने त्यांच्या मूळगावी नेऊन त्याठिकाणी अंत्यसंस्कार केले जाईल. 

हेही वाचा -  खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार -
उरी सेक्टरमध्ये तीन नागरिकही पाकिस्तानच्या गोळीबारात ठार झाले, तर काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उरीचे विभागीय अधिकारी रियाज अहमद मलिक यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतानेही जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानी लष्कराचे सात ते आठ सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील पाक लष्करातील स्पेशल सर्व्हीस ग्रुपच्या (SPG) सैनिकांचाही सहभाग आहे, तर काही पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. पाकिस्तानी बंकर, इंधन साठे, दहशतवादी तळही नष्ट झाले आहेत.

हेही वाचा -  धनत्रयोदशीला तब्बल ५० हजार तोळे सोन्याची विक्री; चांदीच्या विक्रीने गाठला विक्रमी...

कोल्हापूरच्या जवानालाही वीरमरण -
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवानालाही वीरमरण आले आहे. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय 20), असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. ऐन दिवाळीत ऋषीकेश यांना वीरमरण आल्याची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे. ऋषिकेश यांची पहिलीच नेमणूक जम्मू येथे झाली होती.

संपादन - भाग्यश्री राऊत