विद्यार्थ्यांनो, ऑनलाइन शिक्षण घेताना फक्त ३० मिनिटेच वापरा हेडफोन; अन्यथा होणार गंभीर परिणाम

मंगेश गोमासे
Sunday, 22 November 2020

कोरोनामुळे विद्यार्थी सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शाळांकडून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. या शिक्षणामुळे मुले मोबाईलच्या अगदी जवळ आले आहेत. दिवसातून किमान पाच ते सहा तास विद्यार्थी मोबाईलवर शिक्षण घेत असतात.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेडफोन त्रासदायक ठरत आहेत. तासनतास हेडफोन, एअरपॉड्स कानात असल्याने विद्यार्थ्यांना कानदुखी आणि डोकेदुखीची समस्या जाणवत आहे. दुसरीकडे सतत मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्याने लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढत असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - हा हिवाळा की पावसाळा? नागरिकांमध्ये संभ्रम; अवकाळी पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

कोरोनामुळे विद्यार्थी सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शाळांकडून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. या शिक्षणामुळे मुले मोबाईलच्या अगदी जवळ आले आहेत. दिवसातून किमान पाच ते सहा तास विद्यार्थी मोबाईलवर शिक्षण घेत असतात. त्यात विद्यार्थ्यांना तब्बल पाच ते सहा तास कानात हेडफोन घालून संगणक, मोबाईल समोर बसावे लागत आहे. शिक्षकांचे बोलणे नीट ऐकू येण्यासाठी हेडफोनचा आवाजही मोठा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कानदुखीच्या समस्या वाढल्या आहेत. यात प्रामुख्याने कमी ऐकू येणे, कान दुखणे, डोके दुखणे, क्षणिक बहिरेपणा या समस्या पाहायला मिळतात. 

हेही वाचा - अवघ्या दोन दिवसांनी वाजणार शाळेतील घंटा, कोरोनापूर्वी...

हेडफोनचा जास्त वापर केल्यास काही वर्षांत या समस्यांचे प्रमाण वाढण्याची भीती असल्याचे इंदीरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ईएनटी विभागात कार्यरत असलेल्या ऑडिओलॉजीस्ट आणि स्पीचथेरपीस्ट डॉ. मृगा वैद्य यांनी सांगितले. ऑनलाईन शिक्षणात वापरण्यात येणाऱ्या हेडफोनचा वापर किमान २० ते ३० मिनिटे करावा व त्यानंतर ब्रेक घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सध्या त्याचा वापर वाढल्याने दरदिवशी ५ ते १० रुग्ण कानाच्या समस्या घेऊन येत आहे. नागरिकांनी हेडफोन वापराची सवय न बदलल्यास कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याची शक्यता आहे. याशिवाय वारंवार मोबाईल पाहिल्यास डोळ्यातून पाणी येणे आणि इतर आजार होतात. त्यामुळे मोबाईलचा वापर टाळावा, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्यांनो खुशखबर! धान उत्पादकांना मिळणार बोनस; हमीभावात होणार वाढ

कानातील मेणाचा होतो फायदा -
कानाच्या आतील मेण नैसर्गिकरित्या बॅक्टेरियांचा नाश करतो आणि संक्रमणास प्रतिबंधित करतो. कान स्वच्छ करण्यासाठी कापसाचे बोळे वापरल्यास कानातील मेणाचा थर नष्ट होतो. त्यामुळे कानातील अंतर्गत भागाला बॅक्टेरियाच्या संसर्ग होण्याचा धोका वाढतो. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: headphones cause problems of eye and ear