Sunday Interview : पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल; उपराजधानीत एकही गुंड शिल्लक राहणार नाही

अनिल कांबळे
Sunday, 20 September 2020

रात्रगस्त आणि पोलिसांची पॅट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. तसेच जुगार, क्रिकेट बेटिंग, वरली-मटका, अवैध दारूविक्री आणि अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात ‘क्राईम सिटी’ नव्हे तर ‘ऑरेंज सिटी’ म्हणूनच उपराजधानीची ओळख निर्माण होईल.

नागपूर : उपराजधानीत नुकतेच नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलिस दलाची धुरा सांभाळली आहे. आयुक्तपदाचे सूत्रे हाती घेताच त्यांनी शहर पोलिस दलातील वाढता कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी गांभीर्याने पाऊल उचलले आहे. शहर पोलिस दलात यानंतर कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद...

प्रश्‍न - पोलिसांच्या काळजीसाठी काय उपाययोजना केल्यात?
उत्तर -
पोलिस दलात कोरोनाचा बराच शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता आम्ही पोलिस विभागाचे स्वतंत्र आणि सुसज्ज कोविड हॉस्पिटल उघडणार आहोत. पोलिस हॉस्पिटलच्या वतीने प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना व्हीटॅमिन सी, डी आणि मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, यासह मेडिकल किटही पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रदान केल्या आहेत.

हेही वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

प्रश्‍न - पोलिस भरतीचा कितपत फायदा होईल?
उत्तर -
आगामी पोलिस भरतीमुळे शहर पोलिस दलात पदे भरल्या जातील. नव्या दमाचे कर्मचारी मिळतील त्यामुळे पोलिस विभागाल बुस्ट मिळेल. पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल. तपासात गती येईल.

प्रश्‍न - आगामी हिवाळी अधिवेशन बंदोबस्ताचे नियोजन काय?
उत्तर -
हिवाळी अधिवेशनासाठी ‘परफेक्ट’ बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येईल. बाहेर जिल्ह्यातून पोलिस बळ मागविण्यात येणार आहे. सामान्य जनतेच्या सुविधांना कोणताही अडथळा न येऊ देता बंदोबस्त पार पडेल, याची आम्हांला खात्री आहे.

जाणून घ्या - मुंबई-पुण्याला जायचं, नो टेन्शन!, उद्यापासून ही लांब पल्ल्याची  सेवा होणार सुरू

प्रश्‍न - ‘क्राईम सिटी’चा डाग पुसून काढण्यासाठी काय कराल?
उत्तर -
उपराजधानीत एकही गुंड शिल्लक राहणार नाही, यासाठी गुन्हेशाखा दिवसरात्र झटत आहे. रात्रगस्त आणि पोलिसांची पॅट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. तसेच जुगार, क्रिकेट बेटिंग, वरली-मटका, अवैध दारूविक्री आणि अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात ‘क्राईम सिटी’ नव्हे तर ‘ऑरेंज सिटी’ म्हणूनच उपराजधानीची ओळख निर्माण होईल.

प्रश्‍न - भूमाफियांविरोधात काय कराल?
उत्तर -
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात भूमाफियांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

प्रश्‍न - नागपूरकरांकडून काय अपेक्षा आहेत?
उत्तर -
आपले शहर सुंदर, स्वच्छ आणि शांत राहावे, ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे जेव्हा पोलिसांना नागरिकांच्या सहकार्याची गरज असेल तेव्हा नक्की पोलिसांना सहकार्य करा. तुमच्या सुरक्षेसाठी चोवीस बाय सात’ आम्ही सज्ज आहोत. ‘सज्जनाला मैत्रीचा हात आणि दुर्जनाला लात’ अशी आमची भूमिका राहणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independent Covid Hospital for Police