कधी होणार ‘कॅटरिना’चे दर्शन; मेटिंगच्या काळात भेटण्यासाठी यायचा ‘बाजीराव’

The jungle safari of Bor Sanctuary is closed all year round
The jungle safari of Bor Sanctuary is closed all year round

हिंगणा (जि. नागपूर) : नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बोर अभयारण्य आहे. अडेगाव प्रवेशद्वारावर जंगल सफारी सेवा मागील दहा महिन्यांपासून बंद आहे. बोर अभयारण्याच्या खालच्या भागात अडेगाव प्रवेशद्वार असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जंगल सफारी बंद असल्याने ‘कॅटरिना’च्या दर्शनासाठी व्याघ्रप्रेमी आतुर झाले आहेत.

बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्याअंतर्गत येते. १३८ स्क्वेअर मीटर क्षेत्रात बोर अभयारण्य विस्तारले आहे. नागपूर जिल्ह्याच्या टोकावर अभयारण्य असल्याने याचा पर्यटकांना लाभ व्हावा, यासाठी आमदार समीर मेघे यांच्या पुढाकारातून अडेगाव येथे बोर अभयारण्याचे प्रवेशद्वार करण्यात आले. या प्रवेशद्वारावरून जंगल सफारी सुरू करण्यात आली. पर्यटकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.

मार्च महिन्यात कोरोना संक्रमण सुरू झाल्याने पर्यटन बंद झाले. यानंतर पावसाळा सुरू झाला. पाऊस शेवटपर्यंत पडला. यामुळे बोर अभयारण्याच्या खालच्या भागात अडेगाव प्रवेशद्वार आहे. हा भाग अद्याप पाण्याखाली आहे. यामुळे सहा ते सात फूट उंच गवत वाढले आहे. जंगल सफारीसाठी जाणारे रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत.

जवळपास मागील दहा महिन्यांपासून जंगल सफारी सेवा बंद आहे. वर्धा जिल्ह्याकडून असलेले बोर अभयारण्याचे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी जंगल सफारीही सुरू झाली आहे. मात्र, अडेगाव प्रवेशद्वार केव्हा उघडणार, याबाबत अनिश्चितता आहे.

बोर अभयारण्यात पर्यटकांची आकर्षण असलेली कॅटरिना वाघीण आहे. काही वर्षांपूर्वी मेटिंगच्या काळात जंगलात या वाघिणीला भेटण्यासाठी ‘बाजीराव’ वाघ येत होता. यामुळे कॅटरिनाचा परिवार मोठ्या प्रमाणात बहरला. सद्यःस्थितीत बोर भरण्यात जवळपास १४ ते १५ वाघांची संख्या असल्याचे वन्यप्रेमी सांगत आहेत. कोंढाळी मार्गावरील वाहन अपघातात बाजीरावचा मृत्यू झाला होता. यानंतरही कॅटरिनाचा व्याघ्रप्रकल्पात मुक्तसंचार सुरू आहे.

व्याघ्रप्रकल्पाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना कॅटरिना ट्रेस होत असल्याचे बोलले जात आहे. कॅटरिना ही बोर अभयारण्याची शान आहे. लॉकडाउनपासून अडेगाव प्रवेशद्वार बंद असल्याने कॅटरिनाचे व्याघ्रप्रेमींना दर्शन झाले नाही. परिणामी पर्यटक कॅटरिनाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. व्याघ्रप्रकल्पात बिबट, अस्वल, हरिण, चितळ, सांबर, रानडुक्कर, रानम्हशी, रानगवे, मोर यासह इतर तृणभक्षक प्राणी आहेत. यामुळे पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे असतो.

दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता

अडेगाव प्रवेशद्वाराचा मार्ग पूर्ण पाण्याखाली बुडाला आहे. नोव्हेंबर महिन्यातही पाणीसाठा कमी झालेला नाही. गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाणी कमी झाले तरी गवत कापणे व रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्याला दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे जानेवारी २०२१ नंतरच अडेगाव प्रवेशद्वार सुरू होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. तोपर्यंत पर्यटकांना कॅटरिनाच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागणार, एवढे मात्र निश्चित.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com