विमानाने प्रवास करून आला असाल तरीही 14 दिवस घरातच, कोणतीही सूट नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

साहजिकच सर्वसामान्यांना असे वाटेल या कोरोनाच्या काळात विमान प्रवास केल्यास विशेष सूट मिळत असेल किंवा वेगळी वागणूक मिळत असेल. मात्र, असे अजिबात नाही. अशा प्रवाशांना चक्क विलगणीकरणात रहावे लागणार असून सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

नागपूर ः सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे अनेकांना कित्येक दिवसांनी आपल्या घरी परत येता आले. पहिल्याच दिवशी दिल्ली येथून एका पाच वर्षाच्या मुलाने एकचा प्रवास करीत बंगळूर गाठल्याचे वृत्त पुढे आले. त्यावेळी त्याच्या हातात स्पेशल कॅटेगरी असा फलक होता. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना असे वाटेल या कोरोनाच्या काळात विमान प्रवास केल्यास विशेष सूट मिळत असेल किंवा वेगळी वागणूक मिळत असेल. मात्र, असे अजिबात नाही. अशा प्रवाशांना चक्क विलगणीकरणात रहावे लागणार असून सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

जसे इतर नागरिकांसाठी नियम घालून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विमानसेवा सुरू करतानाच प्रवाशांसाठी अटी व नियम लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारने प्रथम विमानसेवेसाठी आडकाठी घेतली होती. मात्र, अखेर काही अटींवर परवानगी देण्यात आली. राज्य सरकारच्या नियमानुसार नागपुरात येणाऱ्या प्रत्येक विमानप्रवाशांना घरीच 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. महापालिकेचे आरोग्य पथक विमानतळावर प्रत्येक येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करणार आहे. थर्मल चाचणीत लक्षणे आढळल्यास प्रवाशाला नजीकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात दाखल केले जाणार आहे.

वाचा - तुकाराम मुंढेंना न्यायालयाचे आदेश, बकरामंडी त्वरीत स्थलांतरीत करा

राज्य सरकारने सोमवारी संध्याकाळी राज्यातील सर्व विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियम ठरविले आहे. नागपुरातील विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवस घरीच विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागपूर विमानतळावर मनपाच्या आरोग्य पथकामार्फत ये-जा करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची "थर्मल स्क्रिनिंग' केली जात आहे. थर्मल चाचणीत कोणतेही लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासासाठी विमानात प्रवेश दिला जात आहे.

आणखी वाचा - अर्ध्यातच संपला ओडिशाच्या मजुराचा प्रवास, सहकाऱ्यांनी उसनवारी करून नेला मृतदेह

सर्व प्रवाशांसह एअरलाइन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करणे तसेच प्रस्थान आणि आगमनानंतरही सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे. विमानप्रवासांनंतर प्रत्येक प्रवासी हा घरातच 14 दिवसांचे विलगीकरणात राहील. याबाबतीत कुठलीही हयगय होणार नाही याबाबत प्रवाशांनीच दक्षता घ्यावयाची आहे.

247 प्रवासी घरीच विलगीकरणात
मंगळवारी नागपूर विमानतळावर दिल्ली व मुंबईवरून विमाने आली. यात एकूण 247 प्रवासी शहरात आले. त्यांची स्क्रिनिंग करण्यात आली. या प्रवाशांना घरीच 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

कुणाला प्रवास करता येणार नाही?
- प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना विमानातून प्रवासबंदी आहे.
- थर्मल तपासणीमध्ये लक्षणे आढळल्यास विमान प्रवासाला बंदी.

अवश्य वाचा - केवळ 20 मिनिटात मुंबई पोलिसांनी वाचवले कोलकात्याच्या तरूणीने प्राण... वाचा हा थरार

काय करावे लागेल प्रवाशांना ?
- प्रत्येक प्रवाशाला "आरोग्य सेतू' ऍप डाउनलोड करून माहिती भरावी लागणार.
- विमानतळावर येताना किंवा विमानतळावरून निवासस्थानी जाताना प्रवाशांना स्वत:च्या वाहनातून प्रवास करावा लागेल.
- प्रत्येक प्रवाशाने विमानतळावर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वयं घोषणापत्र भरणे बंधनकारक आहे.

घोषणापत्रात द्यावी लागणार ही माहिती
- स्वयं घोषणापत्रात प्रतिबंधित क्षेत्रात निवास आहे की नाही?
- विलगीकरणात होते की नाही? लक्षणे आढळली असल्यास माहिती द्यावी लागणार.
- कोरोना चाचणी केल्यास निगेटिव्ह अहवाल आवश्‍यक.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandatory 14-day quarantine for all air passengers coming to Nagpur