महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे दिले निर्देश, संघटनेच्या मागणीनंतर साक्षात्कार

राजेश प्रायकर
Tuesday, 6 October 2020

कोविड-१९मध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने महापौर संदीप जोशी यांच्याकडे सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची यादी सोपविली.

नागपूर : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना काळात मनपाचे सफाई कर्मचारी कुठलीही अडचण पुढे न करता शहराची स्वच्छता करीत आहेत. मात्र, त्यांच्या चाचणीसाठी संघटनेने मागणी केल्यानंतर महापालिकेला साक्षात्कार झाल्याचे दिसून आले. महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी झोनस्तरावर सर्व सफाई कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. 

कोविड-१९मध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने महापौर संदीप जोशी यांच्याकडे सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची यादी सोपविली. त्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या चाचणीचा मुद्दाही होता. यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या. बैठकीत स्थायी समिती सभापती पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य विभागाचे राजेश लवारे, किशोर मोटघरे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिंग कछवाह, नागपूर महानगरपालिका शाखा अध्यक्ष प्रदीप महतो, मोती जनवारे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - नागपूर पोलिसांनी दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यातील वरुणचा फोटो का केला ट्विट?

बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना १ हजार - 
कोविड बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यविधी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आता १ हजार रुपये मोबदला देण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौर जोशी यांनी संघटनेला दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टर रजिस्ट्री संदर्भात पुढील आठवड्यात स्थावर विभागाची बैठक बोलावण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 

हेही वाचा - थकलेले भाडे द्या मगच हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू करा; मालकाच्या मागणीने व्यावसायिक अडचणीत

नियमित करण्यासाठी फडवणीसांसोबत चर्चा -
२२०६ ऐवजदार सफाई कामगार नियमित करण्यात आले. उर्वरित ३५० ऐवजदार सफाई कामगार तसेच शिल्लक सर्व ऐवजदार सफाई कामगारांना नियमित करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे यावेळी महापौरांनी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor sandip joshi order to do covid test of cleaning staff of nagpur municipality