विद्यापीठाच्या ऑनलाईन विधीसभेच्या बैठकीचा फज्जा, नेटवर्क नसल्याने सदस्यांचा बहिष्कार

मंगेश गोमासे
Wednesday, 18 November 2020

ऑनलाईन सभा न घेण्याच्या मुद्द्यावर यापूर्वी सिनेट सदस्यांनी आंदोलन केल्याने विधीसभा बैठक स्थगीत करण्यात आली होती. त्यानंतर ऑफलाईन बैठक घेण्यासाठी विद्यापीठाने राज्यपालांकडे पत्र पाठविले होते. याशिवाय महापालिकेलाही परवानगी मागीतली होती. मात्र, राज्यपालांनी परवानगी न दिल्याने पुन्हा एकदा विद्यापीठाने ऑनलाईन बैठकीचे बुधवारी (ता.१८)आयोजन केले.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बुधवारी पार पडलेल्या ऑनलाईन विधीसभा बैठकीचा चांगलाच फज्जा उडाला. बैठकीदरम्यान नेटवर्क कनेक्टीव्हीटीमुळे सदस्यांना बोलता आणि ऐकता येत नसल्याने अनेक सदस्यांनी संदेश टाकून बैठकीवर बहिष्कार टाकला. याचाच फायदा घेत, विद्यापीठाने विधीसभा लवकरात लवकर गुंडाळली. 

हेही वाचा - बावनकुळेंनी केलेल्या काळ्या धंद्यामुळेच भाजपने त्यांचे...

ऑनलाईन सभा न घेण्याच्या मुद्द्यावर यापूर्वी सिनेट सदस्यांनी आंदोलन केल्याने विधीसभा बैठक स्थगीत करण्यात आली होती. त्यानंतर ऑफलाईन बैठक घेण्यासाठी विद्यापीठाने राज्यपालांकडे पत्र पाठविले होते. याशिवाय महापालिकेलाही परवानगी मागीतली होती. मात्र, राज्यपालांनी परवानगी न दिल्याने पुन्हा एकदा विद्यापीठाने ऑनलाईन बैठकीचे बुधवारी (ता.१८)आयोजन केले. मात्र, सभा सुरू होताच, या मुद्द्यांवर सदस्यांनी आवाज उठविला. मात्र, कुलगुरूंनी राज्यपाल आणि महापालिकेने परवानगी न दिल्याचे स्पष्टीकरण दिले. यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली. मात्र, यादरम्यान काही सदस्यांनी ऑनलाईन बैठकीत नेटवर्कची समस्या आल्याने त्यांना बोलणे ऐकू येत नसल्याचे संदेश टाकले. शिवाय त्याचे बोलणे ऐकू जात नसल्याची तक्रारही केली. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल विद्यापीठाकडून घेण्यात येत नसल्याने या सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ. शरयू तायवाडे, अ‌ॅड. मनमोहन वाजपेयी, डॉ. धनश्री बोरकर, स्मिता वंजारी आणि इतर सदस्यांच्या समावेश होता. विद्यापीठाकडून जाणिवपूर्वक असा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप या सदस्यांनी केला. 

हेही वाचा - नागपूर पदवीधर निवडणूक : संदीप जोशींसह सात उमेदवारांची...

विशेष म्हणजे, काही काळ विद्यापीठाचेही नेटवर्क बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे विधीसभा बैठकीत व्यत्यय आला होता. अनेकदा मधूनच नेटवर्क जात असल्याने सदस्यांना बैठकीत विविध मुद्द्यांवरही बोलता आले नाही. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कुलगुरूंकडून मुद्द्यांवर चर्चा करायची नसल्यानेच हा प्रकार करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगीतले. दरम्यान, या परिस्थितीचा फायदा घेत, अनेक प्रश्न व प्रस्तावावर मर्जीप्रमाणे निर्णय घेत, प्रशासनाने दुपारी चार वाजताच बैठक गुंडाळल्याचे दिसून आले. 

हेही वाचा - 'राम'च्या आधी 'ह' पाहिजे; विजय वडेट्टीवारांची राम कदमांवर टीका

ज्येष्ठ सदस्यांनी फिरविली पाठ - 
विधीसभेत ज्येष्ठ सदस्य नेहमीच विविध विषयांवर प्रशासनाला घेरुन निर्णय मान्य करुन घेत असतात. मात्र, यावेळी ऑनलाईन विधीसभेत जवळपास सर्वच ज्येष्ठ सदस्य बैठकीपासून दूर राहिल्याचे दिसून आलेत. यामध्ये डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. आर.जी. भोयर आणि इतर सदस्यांच्या समावेश होता. 
ऑनलाईन विधीसभेदरम्यान वारंवार संदेश पाठविल्यावरही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. शिवाय आवाजही म्युट करुन ठेवण्यात आल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून आमचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याने त्याचा निषेध म्हणून आम्ही काही सदस्यांनी विधीसभेवर बहिष्कार टाकला. 
अ‌ॅड. मनमोहन वाजपेयी, विधीसभा सदस्य.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: member boycott nagpur university online assembly meeting