दिवाळीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी नागपूरचे आयुक्त थेट उतरले रस्त्यांवर; उपाययोजनांचा घेतला आढावा

राजेश प्रायकर
Wednesday, 11 November 2020

कोरोनाचे संकट कायम असताना नागरिकांनी शनिवार तसेच रविवारी बाजारांत तुडुंब गर्दी केली. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागपूर ः दिवाळीच्या गर्दीमुळे महापालिका ‘ॲक्शन मोड'मध्ये आली असून आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज रात्री बाजारपेठांचा दौरा केला. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांना दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी तसेच बॅरिकेड्स आदी लावण्याबाबत त्यांनी आढावा घेतला. पोलिस ताफ्यांसह आयुक्तांना बघताच अनेक दुकानदारांची यावेळी घाबरगुंडी उडाली.

कोरोनाचे संकट कायम असताना नागरिकांनी शनिवार तसेच रविवारी बाजारांत तुडुंब गर्दी केली. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी काल, सोमवारी तातडीचे बैठक घेऊन अधिकारी तसेच पोलिसांना कोरोना नियमाची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे आदेश दिले. 

हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'

या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही, याबाबत आढावा घेण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन यांनी आज रात्री वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त सारंग दाभाडे यांच्यासह सीताबर्डी, इतवारी, गांधीबाग, महाल या बाजारपेठेत दौरा केला. पोलिसांच्या ताफ्यासह आयुक्त दिसताच अनेक दुकानदारांनी ग्राहकांना बाहेर काढून गर्दी कमी केली. आयुक्तांनी व्हेरायटी चौक ते लोहापूलपर्यंत पायी दौरा करीत सीताबर्डी बाजाराचा आढावा घेतला. 

बर्डीत वाहनांना बंदी लावल्यामुळे नागरिकांना सहज खरेदी करणे शक्य झाले. आयुक्तांनी महालातील बडकस चौकातही पायी फिरून दुकानदारांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी आयुक्तांसोबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, झोनचे सहायक आयुक्त, उपद्रव शोध पथकातील जवान, अतिक्रमण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मास्क न घालणाऱ्या काही नागरिकांवर दंडही ठोठावला.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

दिवाळीनिमित्त बाजारात गर्दी होत असून ते टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बाजारांचा दौरा केला. पोलिस व अधिकाऱ्यांमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली असून स्थिती समाधानकारक आहे.
- राधाकृष्णन बी. 
आयुक्त, मनपा.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur NMC commissioner radhakrushnan b takes look at preventing crowd