'एका खासदाराने आमदारांबाबत घृणास्पद वक्तव्य करणे योग्य नाही'

अतुल मेहेरे
Friday, 25 December 2020

आमदारांना मतदारसंघातील जनतेला उत्तरे देताना नाकी नऊ येत आहेत. त्यातही ते कामे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकशाहीला घातक वक्तव्ये करून लोकप्रतिनिधींचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे पटोले म्हणाले. 

नागपूर : विधानसभेतील एलएक्यू म्हणजे आमदारांसाठी ब्लॅकमेलिंग आणि पैसे उकळण्याचे साधन असल्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत त्यांना लोकशाहीच मान्य नाही. त्यामुळे लोकशाहीवर अविश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. आमदारांना 'जलील' करण्याचा त्यांना अधिकार नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आज म्हणाले. 

हेही वाचा - 'दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर बनू शकत नाही, त्यासाठी तसं हृदयही लागतं'

एक आमदार, लोकप्रतिनिधी त्याच्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघात कामे करण्यासाठी झटत असतो. हे करताना त्यांना घरावरही तुळशीपत्र ठेवावे लागते. मतदारसंघातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, जनसामान्यांचे प्रश्‍न ते विधानसभेत मांडून आपली कामे करवून घेण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणाऱ्याचा मी निषेध करतो, अशा व्यक्तीचा धिक्कार करतो. त्यांच्या पाहण्यात एखादा आमदार, असा आलाही असेल, तर ते त्यांनी त्यांच्यापुरतेच मर्यादित ठेवायला पाहिजे. सरसकट आमदारांबद्दल असे बोलणे योग्य नाही, असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा - Success Story: केली अवघ्या १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक; युवा...

आमदार भालके यांना मी विधानसभेत काम करताना पाहिले आहे. त्यांच्या मतदारसंघातील ३९ गावांचा पाणी प्रश्‍न मांडताना त्यांच्यातील धडपड मी बघितली आहे. त्यांची प्रकृती तेव्हा चांगली नव्हती. तरीही मतदारसंघातील जनतेची कामे व्हावी, यासाठी ते आक्रमक झाले होते. आज ते असते, तर त्यांना किती वाईट वाटले असते, याचा विचार खासदार जलील यांनी बोलण्याआधी करायला पाहिजे होता. आमदार भालकेंसारखे व्यक्ती अगदी जीव जाईपर्यंतही लोकांच्या सेवेसाठी झटले. आपला जीव जातोय याचंही भान त्यांना राहिलं नाही. त्यांच्याप्रमाणे इतरही आमदार काम करतात, असे नाना पटोले म्हणाले. 

हेही वाचा - Inventor : मुलांनो, आता पालकांची चिंता सोडा!...

इम्तियाज जलील स्वतः ब्लॅकमेलिंग करत असतील, तर त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे हे वक्तव्य लोकशाहीसाठी घातक आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारचे संबंध कसे आहेत, हे कुणापासूनही लपलेले नाही. राज्य सरकारकडे पैशांची चणचण आहे. केंद्र सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेची कामे आणि अन्य इतरही बरीच कामे रखडलेली आहे. आमदारांना मतदारसंघातील जनतेला उत्तरे देताना नाकी नऊ येत आहेत. त्यातही ते कामे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकशाहीला घातक वक्तव्ये करून लोकप्रतिनिधींचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे पटोले म्हणाले. 

हेही वाचा - वर बोहल्यावर चढण्याच्या होता प्रतीक्षेत अन् वधू देत होती ऑनलाईन परीक्षा; वऱ्हाडींनी दिलं शिक्षणाला...

...अन् सुरू झाली पेन्शन योजना -
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात एक माजी आमदार रोजगार हमी योजनेच्या कामावर राबत असत आणि दुसरे एक आमदार हातमागावर काम करत होते. ही परिस्थिती या दोन्ही नेत्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितली होती. कायम लोकांच्या कामांसाठी झगडणाऱ्या आमदारांवर अशी कामे करून कुटुंबाचे पालनपोषण करण्याची वेळ आल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले. त्यानंतर मग आमदारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली. असे आमदार ज्या राज्यात आहेत, त्याच राज्यातील एका खासदाराने आमदारांबाबत असे घृणास्पद वक्तव्य करणे दुःखद असल्याचेही नाना पटोले म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nana patole criticized mla Imtiyaz Jaleel in nagpur