राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन : मोफत भौतिकोपचारातून जगण्याला नवी उभारी

केवल जीवनतारे
Friday, 2 October 2020

सेरेब्रल पाल्सीशी लढणाऱ्या मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या मोठी आहे. प्रसूती अथवा गरोदरपणात बाळाच्या मेंदूला इजा झाल्यास शरीरावर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूंची क्षती होते. त्यामुळे या व्याधीशी झुंजणाऱ्यांचे स्वतःवर नियंत्रण रहात नाही.

नागपूर : सेरेब्रल पाल्सीसह बहुविकलांग आजार जडलेली मुले म्हणजे कोमेजलेली फुलंच होतं. या मुलांवर संस्कार करणं तर सोडा, स्वतःचे नैसर्गिक व्यवहारही त्यांना कळत नाही. देशात सेरेब्रल पाल्सी मुलांचीच संख्या २५ लाख तर राज्यात तीन लाखांपेक्षाही अधिक आहे. दर एक हजारात तीन मुलं हा आजार घेऊन जन्माला येतात. या मुलांचे बालमन समजून मोफत भौतिकोपचारातून तसेच उपचारातून त्यांच्या जगण्याला नवी उभारी देण्यासाठी काम करीत आहेत डॉ. विराज शिंगाडे.

जन्माला येताच मेंदूच्या भागातील काही पेशींची हानी झाल्यामुळे शरीराच्या ठेवणीत निर्माण होणाऱ्या कायमस्वरूपी विकृती म्हणजे हा आजार होय. अशा मुलांची वैचारिक वाढ करण्यासाठी विशिष्ट फिजिओथेरपीची गरज असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशानंतर तीन ऑक्टोबरपासून जगभर सेरेब्रल पाल्सी सप्ताह जगभर पाळला जातो. त्या अनुषंगाने साधलेल्या संवादात डॉ. विराज शिंगाडे यांनी या विषयाकडे लक्ष वेधले.

अधिक वाचा - आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा

सेरेब्रल पाल्सीशी लढणाऱ्या मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या मोठी आहे. प्रसूती अथवा गरोदरपणात बाळाच्या मेंदूला इजा झाल्यास शरीरावर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूंची क्षती होते. त्यामुळे या व्याधीशी झुंजणाऱ्यांचे स्वतःवर नियंत्रण रहात नाही. अशा मुलांच्या स्नायूवर शिबिरातून मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. शिंगाडे यांच्यासह बालरोग भूलतज्ज्ञ डॉ. रश्मी शिंगाडे, डॉ. दिपाली मंडलिक, डॉ., सुहास अंबादे, डॉ. मनीष ढोके आणि डॉ. संदीप मैत्रेय सेवा देत आहेत.

दुर्गम भागातील मुलांसाठी उपयोगी

चिमुकल्यांना मोफत फिजिओथेरपी उपलब्ध करून देण्याचे पुण्यकर्म बालअस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शिंगाडे यांनी नागाई नारायण स्मृती फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आले आहे. झोपडपट्टीतील पालकांसह गडचिरोलीसह, मेळघाट, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणासह इतरही दुर्गीम भागातील मुलांच्या शरीर, मन आणि मेंदूवर उपचार करताना त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यावर प्रेमाची फुंकर घालत या मुलांना मायेचा ओलावा देणाऱ्या फिजिओथेरपीतज्ज्ञ डॉ. अल्पना मुळे, फिजियोथेरपी तज्‍ज्ञ प्राजक्ता ठाकरे, रेणुका नाईक, राजपाल यांच्यासह त्यांचे ऑकयूपेशनल थेरपिस्ट तेजल बघेले, अनिता आहुजा यांच्यासह तेजस्विनी जाधव, श्रद्धा कर्णेवार या मुलांचा विकास साधण्यासाठी प्रभावी उपाययोजना करतात. सत्यम बंजारे आणि शुभांगी वाघमारे यांनी मुलांना शब्द आणि सांकेतिक भाषेतून व्यक्त होण्यास मदत केली आहे. स्पेशल थेरपी, मुलांचे आणि पालकांचे समुपदेशन, ऍक्‍टिव्हिटीज अशा सर्व बाबींवर उपचार करतात. अजनी चौकात चिल्ड्रन ऑर्थोपेडिक केअर संस्थेत नागाईच्या माध्यमातून उपक्रमाची सुरुवात केली आहे.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

असे आहेत गैरसमज

  • हा पोलिओचा एक प्रकार आहे
  • व्यक्तीं बौद्धिकदृष्ट्या कमजोर असतात
  • औषधाने सीपी पूर्णपणे बरा करतात
  • मूल वयाबरोबर ठीक होईल

मोफत फिजिओथेरपी सुरू
सेरेब्रल पाल्सी ही अवस्था जन्मतः मेंदूला होणाऱ्या आघाताने होते. ही मुलेदेखील शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. लवकर निदान झाल्यास पुनर्वसनासाठी प्रयत्न करता येतात. आर्थिक दुर्बलतेमुळे ही विशेष मुले उपचाराशिवाय जगतात. या मुलांसाठी सामाजिक दायित्व म्हणून मोफत फिजिओथेरपी सुरू केली आहे.
- डॉ. विराज शिंगाडे,
बालअस्थिरोगतज्ज्ञ, नागपूर.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Cerebral Palsy Day special story