Video : तुकाराम मुंढेंनी आदेश देताच नागपूरच्या या डाॅनच्या बंगल्यावर चालला बुलडेजर... गुन्हेगारांमध्ये खळबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

संतोष आंबेकरने इतवारीत हमालपुऱ्यातील घर अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मनपाला पत्रव्यवहार करून पोलिसांनी आंबेकरचे घराचे अतिक्रमन काढण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी मनपाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता कारवाईला प्रारंभ झाला होता.

नागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या इतवारीतील घरावर मनपाच्या अतिक्रमविरोधी पथकाने मंगळवारी कारवाई केली. मनपा प्रशासनाने कारवाई केल्यावे डॉन आंबेकर थेट रस्त्यावर आला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. सध्या डॉन आंबेकर हा बलात्कार, मोक्‍का, खंडणी, वसुली आणि जिवे मारण्याची धमकी देणे आणि व्यापाऱ्याचे अपहरण करण्याच्या प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात आहे. 

डॉन संतोष आंबेकरने महाराष्ट्रासह अन्य राज्यात आपली दहशत पसरवित मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीची खंडणी वसूल केली आहे. आंबेकरच्या टोळीतील प्रत्येक सदस्याकडे पिस्तूल असल्यामुळे तसेच त्याच्यावर अनेक खंडणीचे आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याची दिवसेंदिवस हिंमत वाढत होती. आयपीएस अधिकारी नीलेश भरणे आणि पोलिस उपायुक्‍त गजाजन राजमाने यांनी गुन्हे शाखेचे सूत्र हाती घेताच आंबेकरला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आंबेकरवर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची फाईल बाहेर काढत त्याची धिंड काढत न्यायालयात हजर केले होते.

 

 

मनपा-पोलिसांची संयुक्‍त कारवाई
दुसरीकडे संतोष आंबेकरने इतवारीत हमालपुऱ्यातील घर अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मनपाला पत्रव्यवहार करून पोलिसांनी आंबेकरचे घराचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी मनपाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता कारवाईला प्रारंभ झाला होता.

गरम पाण्याच्या नळाची तोटी तुटून चार विद्यार्थी भाजले

आंबेकरने तीन प्लॉट जोडून मोठा बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे होता. ज्याचे 60.15 चौरस मीटर बांधकाम हे अनधिकृत होते. दुसरा प्लॉट अमरचंद मदनलाल मेहता यांच्या नावे होता. ज्यावर त्याने 721.56 चौरस मीटर अनधिकृत निर्माण कार्य केले होते. तिसरा प्लॉट संतोष आंबेकरच्या नावावर होता. त्याचे 21.30 चौरस मीटर बांधकाम हे देखील अनधिकृत होते. तिन्ही प्लॉटवर 803 चौरस मिटर (8640.28 चौरस फुट) बांधकाम हे अनधिकृत होते. ज्याच्यावर आज अतिक्रमणविरोधी पथकाने 2 जेसीबी व 1 पोकलेनच्या मदतीने ही कारवाई केली.

म.न.पा.उपायुक्त महेश मोरोणे व पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आता महिन्यातून एकदा रुग्णालय व्हिजिट मस्ट...लवकरच निघणार अध्यादेश 

गुन्हेगारी जगताला मोठा हादरा 
कारवाईदरम्यान लकडगंज पोलिसांचा मोठा फौजताफा तैनात करण्यात आला होता. लकडगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हिरवे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक योगेश चौधरी व म.न.पा.चे सहा.आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्यासह त्यांची चमू या कारवाईत सहभागी होती. 

कोट्यवधीच्या बंगल्याचा भाग पाडला 
डॉन आंबेकर याने राजस्थान, पश्‍चिम बंगाल आणि गुजरात येथील कारागीर आणून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून टोलेजंग बंगला बांधला होता. या बंगल्यात महागडे लाकूड आणि नक्षिकाम केलेले होते. अतिक्रमण विभागाच्या ताफ्याने थेट जेसीबीने बंगला पाडण्यास सुरुवात केल्यानंतर क्षणार्धात टुमदार बंगला भुईसपाट झाला. 

- बायकोच्या जिवापेक्षा दुचाकी प्यारी... गरीब सासरा कुठून आणणार वारंवार पैसे?

इतवारीला छावणीचे स्वरूप 
डॉनचा बंगला पाडत असल्याची वार्ता शहरभर पसरल्यामुळे अनेकांनी कारवाई पाहण्यासाठी गर्दी केली. तसेच गुन्हेगारी जगतातील काहींनी गुपचूप कारवाई पाहण्यासाठी हजेरी लावली. तर आंबेकरच्या टोळीतील सदस्यांनीही सकाळपासूनच गर्दी केली होती, अशी माहिती आहे. आंबेकरच्या साम्राज्याला खऱ्या अर्थाने बंगला पाडल्यामुळे सुरूंग लावल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMC Action on dons bunglow after order ussued by tukaram mundhe