आता बॅंक मागते कर्ज नसल्याच्या दाखला, खरिपाच्या तयारीत "सतराशे विघ्न'...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

खरिपाचा हंगाम सुरू होत आहे. शेतकरी कर्जासाठी बॅंकेचे उंबरठे झिजवित आहेत. बॅंक मात्र कर्ज नसल्याचा दाखला मागत आहे. लॉकडाउनच्या काळात प्रमाणपत्र मिळविणे महाकठीण झाले. खरिपाच्या सुरवातीलाच शेतक-यांच्या मार्गात आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पचखेडी (जि.नागपूर) : शेतीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. बळीराजा काळ्या आईची मशागत करून पेरणीसाठी सज्ज होत आहे. पेरणीच्या तयारीसाठी बियाणाची जुळवाजुळव करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज आहे, तो पुनर्गठित करण्यासाठी तर ज्याच्याकडे चालू कर्ज आहे, तो इकडून तिकडून उधार उसने घेऊन बॅंकेचे कर्ज परतफेड करून नवीन कर्ज उचलण्यासाठी धडपड करीत आहे. परंतु, त्याला कर्ज नसल्याचा बॅंकेचा दाखला मागण्यात येत आहे. त्यामुळे शेतक-यांच्या खरीप हंगामाच्या काळात माशी शिंकण्याचा प्रकार सुरू आहे.

नक्‍की हे वाचा : "ते' दोघे पती-पत्नी दुचाकीवर जात होते घराकडे, रस्त्यातच कशा तुटल्या जन्माच्या गाठी...

अट रद्द करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी
शेतकरी बॅंकेत कर्ज घेण्यास गेले तर त्यासाठी बॅंकेने घालून दिलेली जाचक अट म्हणजे तालुक्‍यातील चार ते पाच बॅंकेचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे. ते मिळविणे शेतकऱ्यांना लॉकडाउन काळात त्रासदायक ठरत असून बॅंकही फुकटची कटकट म्हणून शेतकऱ्यांना कायदा कानून सांगण्यास मागेपुढे पाहत नाही. तेव्हा शासनस्तरावर याची दखल घेत कर्ज नसल्याच्या दाखल्याची अट रद्द करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व युवा प्रगतशील शेतकरी देवेंद्र भोयर यांनी केली आहे.

हेही वाचा : सांगा, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करायचे कधी?

दुसरी बॅंक कर्ज कसे देणार?
सद्यस्थितीत बहुतांश ज्या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज किंवा चालू कर्ज आहे, तेच शेतकरी बॅंकेत कर्ज पुनर्गठनासाठी किंवा कर्जफेड करून नवीन कर्ज घेण्यासाठी बॅंकेत येतात. तुमच्याच बॅंकेचे कर्जबाजारी असताना आम्हाला दुसरी बॅंक कर्ज कसे देणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
सध्या देश डिजिटल इंडियाकडे वाटचाल करीत असताना व्यक्तीचे आधार कार्ड लिंक केले तरी त्या व्यक्तीकडे कोणत्या बॅंकेचे कर्ज आहे, हे माहीत होते. तरीही जगाच्या पोशिंद्यासमोर असल्या प्रकारचा ससेमिरा लावला असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. बळीराजाच्या हितासाठी कर्ज नसल्याच्या दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी देवेंद्र भोयरसह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा : घर चालवावे की पिकावर खर्च करावा, शेतक-यांना पडला प्रश्‍न

जाणिवपूर्वक वेठीस आणण्याचा प्रकार
सगळे जग डिजिटलकडे वाटचाल करीत आहे. त्यात भारत देशही एक पाऊल पुढेच आहे. कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड लिंक केल्यास त्या व्यक्तीकडे कोण कोणत्या बॅंकेचे कर्ज असल्याची माहिती होत असताना जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जाते. तेव्हा ही जाचक अट रद्द
करून शेतकऱ्यांना तत्काळ कर्जवाटप करून आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
देवेंद्र भोयर
युवा व प्रगतशील शेतकरी
पचखेडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the bank asks for a certificate of no loan