आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच संत्रा दरात आली तेजी

विनोद इंगोले
Wednesday, 27 January 2021

1600 ते 2100 रुपये आणि आता 2000 ते 24000 रुपयांचा पल्ला संत्रा दराने गाठला आहे. ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून संत्रा झाडावर ठेवला त्यांना या दरातील तेजीचा फायदा होत आहे.

नागपूर : आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच आता संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. सुरुवातीला 800 ते 1000 रुपये क्‍विंटल असलेल्या संत्र्याचे व्यवहार 2000 ते 2400 रुपये क्‍विंटलवर पोहोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना हा दर मिळत आहे. बाजारातील संत्र्याची आवक 1200 क्‍विंटलची आहे. बाजारात मोसंबीची देखील आवक होत असून त्याचे दर 3000 ते 3500 रुपये क्‍विंटलवर पोहोचले आहेत. 

विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहारातील आवक सद्या होत आहे. त्यासोबतच काही शेतकरी मृगातील संत्रा देखील विक्रीसाठी आणत आहेत. आंबिया बहारातील संत्र्यांचा हंगाम अंतीम टप्प्यात आहे. त्यामुळे दरात तेजी आली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला संत्रा दर 1200 ते 1400 रुपये होते. हंगाम अंतीम टप्प्यात आला असताना त्यात टप्याटप्याने वाढ होत गेली.

जाणून घ्या - औषध विक्रेत्याने डॉक्टरला फोन करून सांगितले पैसे पाठवले अन् सरकली पायाखालची जमीन

1600 ते 2100 रुपये आणि आता 2000 ते 24000 रुपयांचा पल्ला संत्रा दराने गाठला आहे. ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून संत्रा झाडावर ठेवला त्यांना या दरातील तेजीचा फायदा होत आहे. बाजारात मोसंबीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 2500 ते 3000 रुपये दर होता. मोसंबीची आवक 1000 क्‍विंटलची होती. त्यानंतरच्या काळात मोसंबीचे दर 3000 ते 3800 रुपयांवर पोचले. आता 3000 ते 4000 रुपयांवर मोसंबी दर स्थिर आहेत.

बाजारात केळीची आवक 22 क्‍विंटलच्या घरात आहे. केळीला कमीत कमी 450 तर जास्तीत जास्त 550 रुपये इतका दर मिळत असून हाच दर पंधरा दिवसांपासून स्थिर आहे. द्राक्षाचे व्यवहार 4000 ते 6000 रुपये क्‍विंटलने होत असून आवक 189 क्‍विंटलची आहे. डाळींब 5000 ते 12 हजार रुपये क्‍विंटल असून आवक 412 क्‍विंटलची होती. बाजारात बटाट्याची आवक 3000 क्‍विंटलवर आहे. भंडारा तसेच लगतच्या मध्यप्रदेशातून बटाटा आवक होते.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

बटाटा दर 1200 ते 2000 रुपये असे राहिले. बाजारात पांढऱ्या कांदयाची आवक 1502 क्‍विंटल आणि दर 2800 ते 3500 रुपये होते. लाल कांदा आवक 1500 आणि दर 2800 ते 3500 रुपये मिळाले. बाजारात लसून आवक सरासरी 400 क्‍विंटल होती. लसूनाला 4000 ते 8500 रुपयांचा दर मिळाला. बाजारात टरबूज आवक देखील होत आहे. 15 क्‍विंटलची आवक आणि दर 200 ते 300 रुपये क्‍विंटलचे होते. निंबू आवक दहा क्‍विंटल आणि दर 300 ते 400 रुपये होते. 

बाजारात ज्वारीची अवघी तीन क्‍विंटल आवक होत दर 2200 ते 2500 रुपये क्‍विंटल होते. गहू आवक 234 क्‍विंटल आणि दर 1600 ते 1768 रुपये. तांदूळाचे दर 4200 ते 4500 रुपये क्‍विंटल आणि आवक 60 क्‍विंटल होती.

हरभरा आवक 36 क्‍विंटल तर दर 3900 ते 4160 रुपये, तुरीचे दर 5600 ते 6000 रुपये क्‍विंटल आणि आवक 140 क्‍विंटलची होती. भुईमूग शेंगांची आवक 12 क्‍विंटल आणि दर 3800 ते 4000 रुपये, सोयाबीन आवक 408 क्‍विंटल आणि दर 3900 ते 4367 रुपये होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orange prices rose in vidarbha