मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालक ‘निगेटिव्ह’; केवळ दहाच टक्के पालकांचे संमतीपत्र

Parents are negative about sending their children to school
Parents are negative about sending their children to school
Updated on

नागपूर : मिशन बिगिन अगेनअंतर्गत शहरातील खाजगी तसेच महापालिका शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली. परंतु, पहिल्या दिवशी केवळ दहाच टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत उत्सुक नसल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे संमतीपत्र दिलेल्या पालकांच्या मुलांंनीही शाळेपासून दूर राहणेच पसंत केल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

तब्बल दहा महिन्यांनंतर सोमवारपासून शहरातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली. महापालिकेच्या २९ शाळांमध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी मास्क, पाणी बॉटल, सॅनिटायझरसह शाळेत उत्साहाने प्रवेश केला. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून ओसाड पडलेल्या शाळांमध्ये काही प्रमाणात किलबिल सुरू झाली. प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणी करण्यात आली. त्यानंतरच त्यांना  वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला.

वर्गखोलीमध्येही सुरक्षेची काळजी घेण्यात आल्याचे दिसून आले. वर्गामध्ये एका टेबलवर एक याप्रमाणे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून मास्कसह विद्यार्थी दिसून आले. शिक्षकांनीही मास्कचा वापर केलाच, शिवाय सामाजिक अंतराने शिकवणीही सुरू केली. मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दरम्यान, शहरातील ५३० खाजगी शाळा व महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नगण्य दिसून आली. केवळ दहा टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. खाजगी शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या. परंतु पालकांनीच विद्यार्थ्यांना पाठविले नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद नसल्याचेच चित्र होते. सामाजिक अंतरामुळे विद्यार्थी एकमेकांपासून दूर असल्याने त्यांनाही शाळेत एकाकीपणा जाणवू लागला. पालकांची अनुत्सुकता, विद्यार्थ्यातील एकाकीपणाची भावना, यामुळे ही संख्या आणखी रोडावणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मनपा शाळांत पहिल्याच दिवशी पुस्तके

शाळेच्या पहिल्याच दिवशी नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांचे गणवेशही लवकरच वितरीत केले जातील. याशिवाय लवकरच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘टॅब’ देण्यात येणार असल्याचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सांगितले. 

ऑनलाईनही शाळा सुरू राहणार

शाळेमध्ये विद्यार्थी येण्यापूर्वी पालकांनी संमतीपत्र देणे मनपाद्वारे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ १३८४ पालकांंनीच संमतीपत्र दिले. संमतीपत्र न दिलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीनेच सुरू राहणार असल्याचे मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी नमुद केले. 

६७ शिक्षक पॉझिटिव्ह

शहरातील खाजगी शाळा व मनपा शाळांच्या शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. शहरातील महापालिकेच्या पाच शिक्षकांसह खाजगी शाळेतील एकूण ६७ शिक्षक पॉजिटिव्ह आढळून आले. याशिवाय शाळांमधील पाच कर्मचारीही बाधित आढळले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.

अशी आहे आकडेवारी

  • शहरातील एकूण शाळा - ५८०
  • सुरू झालेल्या शाळा - ५५९
  • नववी ते बारावीचे एकूण विद्यार्थी - १ लाख ४१ हजार ६६८
  • संमतीपत्र दिलेल्या पालकांची एकूण संख्या - १४ हजार ८१९ 
  • उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या - १४ हजार ९७ 
  • मनपा शाळा - २९ 
  • नववी, बारावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या - ३ हजार ८९६
  • संमतीपत्र दिलेल्या पालकांची संख्या - १ हजार ३८४ 
  • उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या - १ हजार २८३

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com