
नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे चिमुकल्यांना आणि नागरिकांना घराबाहेर निघणंही कठीण झालं आहे.
नागपूर ः नागपुरातील सुभाषनगर परिसरात गेल्या चार दिवसांपासून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे चिमुकल्यांना आणि नागरिकांना घराबाहेर निघणंही कठीण झालं आहे.
या भागात सांडांनी धूडगूस घातला असून अनेकांची वाहने तोडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या सांडांच्या लढाईमुळे अनेकांचे नुकसान झाले असून या भागातील चिमुकल्यांत दहशत निर्माण झाली आहे. अनेक पालकांसह चिमुकल्यांनाही घराबाहेर निघणे कठीण झाले असून सकाळी या परिसरात येणारे महापालिकेचे कर्मचारी धृतराष्ट्र बनले आहे.
जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार
सुभाषनगर येथील बिरसा मुंडा समाज मंदिर परिसरात गेल्या चार दिवसांपासून सांडांना धूमाकूळ घातला आहे. सांडांचे युद्ध अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र असले तरी या परिसरात सांडांनी केलेल्या नुकसानीमुळे परिसरातील नागरिक दहशतीत आले आहेत. समाज मंदिर परिसरातील मैदानात लहान मुले खेळत असतात. या चिमुकल्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक पालकांनी तर मुलांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली.
आज सकाळी या सांडांनी परिसरातील कार, दुचाकी, मालकवाहक पाचचाकी वाहने तोडली. दोन सांडांच्या लढ्यात तीन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या दुचाकीचे नुकसान झाले. आज पाचचाकी मालकवाहक वाहनांच्या समोरच्या काचा फुटल्या. एवढेच नव्हे तर दुचाकीही खाली पाडून त्यावरच सांडांचा लढा सुरू झाल्याने या दुचाकीचेही नुकसान झाले. एका पंडीत नावाच्या भाजीपाला विक्रेत्याचा ठेलाच या सांडांनी उलटविल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांत जीवाचीच नव्हे तर वाहनांच्या नुकसानीचीही भीती निर्माण झाली आहे.
हा परिसर स्वच्छ करण्यासाठी दररोज महापालिकेचे जमादार तसेच सफाई कर्मचारी येतात. गेल्या चार दिवसांपासून तेही सांडांची लढाई बघत आहे. परंतु याबाबत त्यांच्याच विभागाला कळवून सांडांचा बंदोबस्त करण्याऐवजी तेही दुर्लक्ष करीत आहे. काही नागरिकांनी महापालिकेला याबाबत कळविले. मात्र, अद्यापही महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून सांडांना पकडून नेले नसल्याने परिसरातील शेकडो नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
नक्की वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
संरक्षक भिंतीचे रॅलींगही तोडले
समाज मंदिर परिसराला संरक्षक भिंत असून त्यावर रॅलींग आहे. सांड एकमेकांवर जोरदार आदळत असल्याने ते या भिंतीवरही गेले. परिणामी संरक्षक भिंतीचे रॅलिंगही तोडले. एवढेच नव्हे भिंतीचा काही भागही कोसळला.
संपादन - अथर्व महांकाळ