खासगी वाहनाने पोलिसांची गस्त! एमटीओ बनला पांढरा हत्ती

अनिल कांबळे
Wednesday, 13 January 2021

प्रत्येक पोलिस ठाण्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी गस्त घालण्यासाठी चारचाकी वाहने, पॅट्रोलिंगसाठी दुचाकी वाहने ठेवण्यात आली आहेत. मात्र, यातील चक्क वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची वाहनेसुद्धा नादुरूस्त असल्याने अनेकदा पीआयसुद्धा गस्त वाहनातून पॅट्रोलिंग करीत असतात.

नागपूर : शहर पोलिस दलातील जवळपास ६० टक्के वाहने नादुरूस्त आहेत. त्यामुळे थातूरमातूर दुरुस्ती करून खटारा वाहनांवर गस्तीचे काम करावे लागत आहे. शासकीय दुचाकींची अवस्था तर खुपच बिकट आहे. स्मार्ट पोलिस दलाची गस्त प्रणालीच 'ऑक्सीजन'वर असल्याचे चित्र उपराजधानीत आहे. 

हेही वाचा - लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पोलिस ठाण्याला जवळपास तीन चारचाकी वाहने आणि ४ ते ६ दुचाकी एमटीओच्या (मोटर वाहन तांत्रिक विभाग) माध्यमातून देण्यात आल्या आहेत. वारंवार वाहनांची दुरुस्ती निघत असल्याने त्याची झळ पोलिस कर्मचाऱ्यांच्या खिशाला बसत आहे. पोलिस आयुक्तांना याकडे लक्ष देण्यात वेळ नसल्याने कर्मचारी मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. उपराजनधानीत गुन्ह्यांचा तपास करणे आणि अटक आरोपींना न्यायालयात हजर करणे, तपासासाठी शहरातील इतर भागांत फिरणे आदी कारणांसाठी पोलिसांना वाहनांची गरज असते. मात्र, अपुरी वाहनांची संख्या, त्यात जुनाट आणि देखरेखीअभावी नादुरुस्त वाहने यामुळे पोलिसांची दमछाक होत आहे. 

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

प्रत्येक पोलिस ठाण्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी गस्त घालण्यासाठी चारचाकी वाहने, पॅट्रोलिंगसाठी दुचाकी वाहने ठेवण्यात आली आहेत. मात्र, यातील चक्क वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची वाहनेसुद्धा नादुरूस्त असल्याने अनेकदा पीआयसुद्धा गस्त वाहनातून पॅट्रोलिंग करीत असतात. पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनांची देखरेखीअभावी दुरवस्था झाली आहे. 

एमटीओमध्ये भोंगळ कारभार - 
नादुरुस्त वाहनांच्या दुरुस्तीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना एमटीओत जावे लागते. येथे पोलिस कर्मचाऱ्यांनाच चिरीमिरी देऊन शासकीय वाहनांची वेळेत दुरुस्ती करून घ्यावी लागत असल्याचे बोलले जाते. अनेकदा रजिस्टर मेंटेन न केल्याचा ठपका ठेवून अडवणूक करण्यात येते. त्यासाठीसुद्धा कर्मचाऱ्यांना एमटीओत आपल्या पदरचे चार पैसे खर्च करावे लागत असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

पेट्रोल खिशातील पैशातून - 
अनेकदा शासकीय वाहनात एमटीओकडून कमी पेट्रोल दिले जाते. मात्र, रजिस्टरवर पूर्ण पेट्रोल दिल्याची नोंद केल्या जाते. हा सर्व भार ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. बिट मार्शलसाठी दिलेल्या दुचाकी खटारा झाल्या असून दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चसुद्धा कर्मचारी खिशातून करीत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police use private vehicle for patrolling in nagpur