चिकन अन् अंड्यांची मागणी घटली, पोल्ट्री उद्योगाला ३० कोटींचा फटका

राजेश रामपूरकर
Wednesday, 13 January 2021

चिकनची विक्री पन्‍नास टक्के तर अंड्याची विक्री ३० टक्क्यांनी खाली आली आहे. मागील पाच दिवसात विदर्भातील या क्षेत्रातील कंपन्यांसोबत शेतकऱ्यांना ३० कोटींचा फटका बसला आहे. 

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाला चांगले दिवस येऊ लागले असताना 'बर्ड फ्लू'चा उद्रेक झाला. परिणामी चिकनची विक्री पन्‍नास टक्के तर अंड्याची विक्री ३० टक्क्यांनी खाली आली आहे. मागील पाच दिवसात विदर्भातील या क्षेत्रातील कंपन्यांसोबत शेतकऱ्यांना ३० कोटींचा फटका बसला आहे. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

अनेक राज्यांनी चिकन आणि अंड्याची आंतरराज्य व्यापारबंदी लागू केल्याने पोल्ट्री उद्योगाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. 'बर्ड फ्लू'मुळे हा व्यवसाय डबघाईस येण्याची शक्यता आहे. 

विदर्भात ब्रॉयलर पक्ष्यांची महिन्याला कोंबड्याचे ३५ लाख, तर साडेतीन कोटी अंड्याचे उत्पादन होते. ब्रिडर कोंबड्याचे उत्पादन १५ हजार होते, तर दररोज दोन लाख किलो चिकन, सव्वा लाख अंड्यांची विक्री होती. ती उलाढाल अंदाजे सहा सहा कोटीची आहे. बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी अंडे आणि चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याने ५० टक्के म्हणजे तीन कोटीची घसरण व्यवसायात झालेली आहे. 

हेही वाचा - हृदयद्रावक! उडलीच नाही त्या तरुणाच्या स्वप्नांची पतंग; दुचाकीवरून जाताना घडली अंगावर...

या व्यवसायात अंदाजे ८०० शेतकरी व हजारो फार्म आहेत. त्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ५० हजार लोकांना रोजगार मिळतो. त्यात ट्रान्सपोर्ट, चिकन सेंटर, खाद्य विक्रेते, औषध विक्रेते आणि उत्पादकांसह कामगारांचा समावेश आहे. बर्ड फ्लूच्या भीतीने गेल्या आठवड्यापासून ग्राहक संख्येमध्ये ५० टक्के घट झालेली आहे. पूर्वी १६० रुपये किलो दराने विकले जाणारे चिकन आता ७० ते ८० रुपये किलोने विकले जात आहे. अंड्यांचा दर नगामागे दोन ते तीन रुपयांनी कमी झाला आहे. नित्यनेमाने अंडी घेणारे ग्राहकही पाठ फिरवत आहेत. 

हेही वाचा - नागपुरात हे चाललंय काय? गेल्या १० दिवसांत मांजानं...

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर डबघाईस आलेल्या पोल्ट्री व्यवसायाला उभारी मिळू लागली असताना बर्ड फ्लूने पुन्हा संकट उभे ठाकले आहे. बर्ड फ्लूच्या संकटाचा सामना करण्यास पोल्ट्रीचालक असमर्थ असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पात या व्यवसायाला उभारी देण्यासाठी विशेष तरतूद करावी. 
-सुधीर दुद्दलवार, माजी सचिव, विदर्भ पोल्ट्री फॉर्म असोसिएशन. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poultry industries facing problems due to bird flu in nagpur