ब्रेकींग ग्रामीण : रामटेकला आले होते फिरायला अन्‌ तेथेच झाला घात, तरूणीचा काय होता गुन्हा,...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

बरेच दिवस लॉकडाउनमध्ये अडकल्यामुळे "त्या' दोघा मित्रमैत्रिणीला बाहेर फिरण्याची हौस झाली. आज शनिवार असल्यामुळे कारने दोघेही बाहेर पडले. अचानक रामटेक मार्गावर गाडी उलटली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.

रामटेक (जि.नागपूर) :  "ते' दोघेही कारने रामटेकला फिरायला आले होते. मात्र नवरगाव शिवारातील गौरव हॉटेलसमोर त्यांची कार उलटली. तरूणी कारखाली दबून जागीच ठार झाली तर तरूण जखमी झाला. मृत तरूणीचे नाव नितूसिंग सुरेशसिंग चौहान (वय24 ,भवानी मंदिर मागे,पारडी नागपूर) असे असून सचिन हरिभाऊ धांडे (वय 29,पारडी) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

हेही वाचा : अबब ! माया झाली "बारा' बछडयांची माय !!

"ते' आले होते नागपूरवरून
शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास रामटेक-तुमसर मार्गावर नवरगाव शिवारात हॉटेल गौरवसमोर रिटझ कार उलटून गाडीखाली तरूणी दबली असल्याची माहिती मिळाल्याने ठाणेदार दिलीप ठाकूर यांच्या आदेशाने बिट जमादार कोठे व वाहतुक शिपाई रामेलवार घटनास्थळी पोहोचले. लगेच लोकांच्या मदतीने तरूणीला गाडीखालून काढण्यात आले. गाडीतील तरूण जखमी असल्याचे दिसून आले. दोघांनाही उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. डॉक्‍टरांनी तरूणी ठार झाल्याचे सांगितले. तर तरूण किरकोळ जखमी असल्याचे दिसून आले. तपासाअंती तरूण-तरूणी पारडी नागपूर येथील असल्याचे तरूणाने सांगितले. दोघेही रामटेकला फिरायला आले होते.

आणखी वाचा : धंदयावर बसण्याची धमकी देणारी "लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळयात

रस्त्याचे कॉंक्रीटीकरण ठरले अपघाताचे कारण
रामटेक-तुमसर मार्गाचे कॉंक्रीटीकरणाचे काम गेल्या एक-दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे या सिमेंट रस्त्याची ऊंची चार ते साडेचार फूट उंच करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूचे काम झाले असून दुसरी बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. त्याठिकाणी मातीमिश्रीत मुरूम टाकण्यात आला आहे. रात्री भरपूर पाऊस झाला, त्यामुळे रस्त्यांवरून गाड्या घसरून अपघाताचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

आणखी वाचा : नागपूरचे मिहान देखिल होतेय अनलॉक, हे उद्योग झाले सुरू

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेल्या या रस्त्याच्या बांधकामात प्रचंड दिरंगाई तर करण्यात येतच आहे, पण राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे काम येथे होत नाही. मार्गातील विजेचे खांब अद्यापही हटविण्यात आले नाहीत . रस्त्याची उंची एव्हढी घेण्याचे कारणही समजले नाही. या उंच रस्त्यामुळे रात्रीस वाहनांचा प्रकाश डोळ्यांवर येऊनही अपघात होत आहेत. "बारब्रिक' नावाची ही कंपनी या भागातील कोणत्याही नेत्याला जुमानत नसल्याचेही जनतेत चर्चिले जात आहे. या रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाल्यास बारब्रिक कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे आवश्‍यक आहे. मात्र कंपनीला पाठीशी घालणाऱ्या नेत्यांचीही या भागात काही कमी नाही. त्यामुळे सर्वसाधारण जनता मेली काय आणि जगली काय कोणालाही काही सोयरसुतक नसल्याची जनतेत खंत व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramtek had come for a walk and the attack took place there