वाह रे पोलिस! जप्त केले ४ लाख, दाखवले २६ हजार; हेराफ़ेरीत ग्रामीण पोलिस अव्वल

Rural Police did fraud in money read full story
Rural Police did fraud in money read full story

सावरगाव मेंढला (जि. नागपूर) : जलालखेडा पोलिस ठाण्यांतर्गत वरुड-नरखेड-जलालखेडा टी पॉईंट परिसरातील एका शेतातील सुरू असलेल्या जुगारावर  शुक्रवारी (ता.२१) रात्री ९.३० च्या दरम्यान क्राईम ब्रांच नागपूर ग्रामीण पोलिस पथकाने छापा मारला. छाप्यादरम्यान १० जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याजवळील मोबाईल, कार, मोटरसायकल व रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई केली. 

जप्त केलेली रोख रक्कम ही अंदाजे चार ते साडेचार लाख होती . परंतू पंचनाम्यात मात्र केवळ २६ हजार ७८० रुपये दाखविण्यात आले. ४ लाख रुपयांची हेराफेरी क्राईम ब्रांच दलाने केल्याचे उघड झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार ही सर्व रक्कम कॉन्स्टेबल सुनील मिश्रा याने जमा केल्याची तक्रार प्रकरणात आरोपी असलेल्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महानिरीक्षक नागपूर रेंज व पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्याकडे केली आहे. पोलिस पंचनाम्यानुसार एक कार, एक मोटरसायकल, १० मोबाईल हँडसेट, २६ हजार ७८० रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य असे ५लाख२९हजार७८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडून चार ते साडेचार लाख रुपये सुनील मिश्रा नावाच्या कॉन्स्टेबलने जप्त केल्याचे आरोपींचे म्हणणे आहे.

तालुक्यात पोळ्याच्या सणादरम्यान जुगार खेळण्याची परंपरा अनादी काळापासून सुरू आहे. त्याचे कालानुरूप स्वरूप बदलले आहे. पोळ्याच्या सणाची संधी साधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगाराचे आयोजन करण्यात येते. या संधीचे पोलिस विभागाकडून सोने करण्यात येते. परिसरात जुगार भरविणाऱ्यांकडून हजारोची देण घेण्यात येऊन त्यांना संरक्षण देण्याची हमी दिली जाते. परंतू वरिष्ठांच्या आदेशानंतर थातुरमातुर कारवाई करण्यात येते. धाडी दरम्यान पंचनाम्यातील जप्तीपेक्षा कितीतरी पटीने रक्कम जप्त करण्यात येते. असाच प्रकार जलालखेडा येथे घडल्याचे उघड झाले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या क्षेत्रातील जलालखेडा या गृहक्षेत्रातच हा प्रकार झाला आहे. गस्तीच्या नावावर सुनील मिश्रा हे या भागातील अवैध धंद्यांना नेहमीच संरक्षण देतात. या भागातील वसुली तेच करतात, असे अवैध धंदे वर्तुळातून सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी सावनेर येथे नकली नोट प्रकरण उघडकीस आले होते. त्या प्रकरणातही हाच पोलिस कॉन्स्टेबल सामील होता व त्याची चौकशीही झाली होती, असे पोलिस वर्तुळातून समजते. वरिष्ठांना रसद पुरविण्यात त्याचा हातखंडा असल्यामुळे तो क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत आहे. खुद्द गृहमंत्र्यांच्याच क्षेत्रात असा प्रकार करण्याची त्यांची हिम्मत झाली. या प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई होते, याबाबत पोलिस विभागात चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com