
तीन वर्षापूर्वी ॲथलेटिक्सला सुरुवात करणाऱ्या संदीपची शर्यतीतील सुरुवात संथ झाली. त्यामुळे तो सुवर्णपदक विजेता तमिळनाडूचा के. हरीहरनपेक्षा एक दशांश सेकंदाने माघारला.
नागपूर : ॲथलेटिक्समध्ये नागपूरचीच नव्हे तर विदर्भाची ओळख ही लांबपल्याच्या धावपटूंची. हर्डल्स शर्यतीतील यश दुर्मिळच. ऑलिंपियन राजीव बालकृष्णन, चित्रा पानतावणे, यवतमाळचा जय टेंभरे, नागपूरचे नागेश आसानी, रश्मी ठाकरे, श्रद्धा तेलरांधे अशी काही मोजकी नावे लक्षात येतात. यापैकी फक्त राजीव बालकृष्णनच्या नावावर राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम आहे. आता या पंक्तीत उमरेडच्या १५ वर्षीय संदीप गोंडने स्थान मिळविले आहे. त्याने गुवाहाटी येथे सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १६ वर्षाखालील मुलांच्या ८० मीटर हर्डल्स शर्यतीत रौप्यपदक जिंकून हा मान मिळविला आहे.
तीन वर्षापूर्वी ॲथलेटिक्सला सुरुवात करणाऱ्या संदीपची शर्यतीतील सुरुवात संथ झाली. त्यामुळे तो सुवर्णपदक विजेता तमिळनाडूचा के. हरीहरनपेक्षा एक दशांश सेकंदाने माघारला. हरीहरनने १०.८० तर संदीपने १०.८१ सेकंद वेळ दिली. राजीव बालकृष्णनने पुण्याच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणि त्यानंतर तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करताना १९९५मध्ये चेन्नई येथे आंतरराज्य स्पर्धेत ११० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.
हेही वाचा - भारतरत्नांना कोणासमोरही देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका
सर्वप्रथम गजानन ठाकरे यांनी उमरेडच्या खाणीतील या हिऱ्याला पैलू पाडण्यास सुरुवात केली. मात्र, काही महिन्याच्या सरावानंतर तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला. तिथे महेश पाटील आणि जय टेंभरे यांनी त्याच्यातील गुणवत्ता ओळखली. एक वर्षापूर्वी तो नागपूरच्या प्रबोधिनीत दाखल झाला. मात्र, लॉकडाउन लागल्याने तो गेल्या दहा महिन्यापासून उमरेड येथेच ओम साई स्पोर्टिंग क्लबमध्ये प्रफुल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही प्राथमिक सोयी नसतानाही हर्डल्सचे धडे गिरवीत आहे.
याबद्दल तो म्हणाला, उमरेड येथे हर्डल्सच्या सरावासाठी उत्तम मैदान नाही, दर्जेदार हर्डल्सही नाही. त्यामुळे पाइप कापून त्याचे हर्डल्स तयार केले आहे आणि त्यावरच सराव करतो. रेल्वेने गुवाहाटीचा प्रवास लांबचा आणि थकवणारा असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी विमानाने येण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रबोधिनीतील हँडबॉल प्रशिक्षक उज्ज्वला लांडगे यांनी मदत केल्याचे संदीपने आवर्जून सांगितले. घरी छोटेसे किराणा दुकान असून वडील ऑर्डरप्रमाणे ढोकळे विकण्याचे काम करतात, असेही त्याने सांगितले.
संदीपची स्पर्धेतील कामगिरी
प्राथमिक फेरी - ११.१८ सेकंद - प्रथम
उपांत्य फेरी - १०.८९ सेकंद - प्रथम
अंतिम फेरी - १०.८१ सेकंद - द्वितीय
हेही वाचा - चला, शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करूया; शेतकरी आंदोलनाचे नेते अमर हबीब यांचं आवाहन
‘१०-१५ हजार रुपये खर्च करून स्पर्धेला यायचे आणि फाऊल झाल्याने क्षणात स्पर्धेतून बाहेर जाण्याची भीती कायम मनात होती. त्यामुळे सुरुवात संथ केली. त्याचा फटका बसला आणि सुवर्णपदक थोडक्यात निसटले. मात्र, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच रौप्य जिंकल्याचा आनंद नक्की आहे. हे पदक कायम स्मरणात राहील.
-संदीप गोंड
-विजेता खेळाडू
संपादन - अथर्व महांकाळ