
हा नवा मित्र मिळाल्यामुळे पाचपन्नास विद्यार्थी एकाचवेळी आनंदून जातात. नंतर गुरुजी एकएका पुस्तकातील अंतरंग मुलासमोर आपल्या विनोदी ढंगाने उलगडून दाखवत त्यांना हास्यरसात चिंब भिजवितात. त्यानंतर पुस्तकातील काही पाने वाचायला सांगून, त्यातील काही उतारे दिलेल्या कोऱ्या पानावर लिहायला सांगतात.
नागपूर : पुस्तकांशी मैत्री करण्याच्या कोवळ्या वयात विद्यार्थ्यांना मोबाइल आणि संगणकाशी थेट संबंध येऊ लागला आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीवर मोठा परिणाम झाला आहे. भविष्यात वाचनसंस्कृतीची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. परंतु, पुस्तकातील अभ्यासाची पोकळी तांत्रिक माध्यमे भरून काढणार काय, असा प्रश्न निर्माण झालेल्या या काळात एखादा शिक्षक रविवार सुटीचा दिवस आपल्या कुटुंबीयांसोबत न घालविता विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रूढ व्हावी, यासाठी खर्ची घालत असेल तर ओल्या मातीला आकार देऊन मूल्यशिक्षणाची मूर्ती घडविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. गत एक दशकापासून चिमुकल्यांना वाचनरूपी संस्काराच्या माध्यमातून अविरत सिंचन करून नवीन पिढीचे भविष्य घडविण्याचा वसा वर्धा जिल्ह्यातील एका अवलियाने घेतला आहे.
सचिन निवृत्तीनाथ सावरकर असे पुस्तकदोस्ती चळवणीच्या प्रणेत्याचे नाव आहे. सर्वसामान्य कुटुंबातील, पण संघर्ष करून विद्यादानाचे कार्य स्वीकारलेले सावरकर बालसुलभ मनाला घडविण्याचे कार्य करीत आहेत. काही वर्षांपूर्वी कॉमिक्स, इसापनिती यासारख्या लहान-लहान गोष्टींच्या माध्यमातून मुलांचे वाचन होत असे.
अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
मात्र, २१ व्या शतकात समाजाचे चित्र पार बदलल्याचे दिसत आहे. आयुष्याच्या ज्या टप्प्यात मूल्यशिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी हातात पुस्तक हवे त्या वयात नासमज मनावर अक्षरश: अत्याचार करणारा मोबाइल दिला जातो. अशा काळात कोवळ्या मनाला वाचनाची आवड लावून अंत:प्रेरणा जागृत करण्याचे अभिनव कार्य ध्येयवेडे गुरूजी करीत आहे.
सर्वांसाठी रविवार हा सुटीचा दिवस म्हणजे ‘एंजॉय’ करण्याचा दिवस. मात्र, सावरकर गुरुजींचा रविवार म्हणजे बालमित्रांच्या सान्निध्यात आणि पुस्तकांच्या सहवासात आनंदाने घालविण्याचा दिवस. गावोगावी फिरून मुलांना छोटी-छोटी गोष्टींची पुस्तके त्यांच्या हातात देऊन मुलांना एकत्र करतात. कधी ओळखीच्या घरी, मंदिराच्या पारावर तर कधी झाडाखाली, शाळेच्या मोकळ्या आवारात मुलांच्या हातात पुस्तक देताना ‘हाच माझा खरा मित्र’ असे त्यांच्याकडून वदवून घेतात.
हा नवा मित्र मिळाल्यामुळे पाचपन्नास विद्यार्थी एकाचवेळी आनंदून जातात. नंतर गुरुजी एकएका पुस्तकातील अंतरंग मुलासमोर आपल्या विनोदी ढंगाने उलगडून दाखवत त्यांना हास्यरसात चिंब भिजवितात. त्यानंतर पुस्तकातील काही पाने वाचायला सांगून, त्यातील काही उतारे दिलेल्या कोऱ्या पानावर लिहायला सांगतात.
हे सर्व झाल्यानंतर ‘मी वाचलेले पुस्तक’ यावर त्यांना बोलते करतात. मुले आपल्या बोबड्या भाषेत मी काय वाचले हे तत्काळ सांगतात. चार-पाच तासांच्या या आनंददायी वातावरणात गुरूजी बालमनाला वाचनाची गोडी लावण्यात यशस्वी होतात. अर्थात गुरूजी पुस्तक पेरत जातात अन् वाचनाची रोपे उगवीत जातात.
जाणून घ्या - Success Story : आईने अंगावरील सोनं गहाण ठेवून शिकवले पोरीला अन् तिने कमालच केली
५ ते १५ वयोगटातील मुलांना एकत्र करून त्यांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वितरित करून चालविलेले ‘पुस्तकदोस्ती अभियान’ म्हणजे भावीपिढीच्या जडणघडणीसाठी टाकलेले हे प्रथम पाऊल आहे. मुलांमध्ये देव शोधणाऱ्या आणि चांगल्या पुस्तकांना समाजाचा मित्र बनविण्यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या सावरकर गुरुजींचे कार्य अभिनव आणि प्रेरणादायी आहे. वर्धा जिल्ह्यात त्यांच्या कार्याला एका चळवळणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शिक्षकीपेशा स्वीकारलेले अनेक गुरुजी शाळा सुटली की, आपले कुटुंब, नातेवाइकांतच आनंदी असतात. गावात शिकवून शहराच्या ठिकाणी राहतात. मात्र, एकदा शाळा संपली की उद्या शाळेची आठवण होते. अनेक जण खासगी शिकवणीच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावितात. अशावेळी सावरकर गुरुजींचा आदर्श घेऊन मुलांना घडविण्याचे कार्य केले तर पुस्तक वाचन चळवळीच्या माध्यमातून भविष्यात सक्षम विद्यार्थी घडविता येईल. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर हे साध्य करता येईल. हीच इच्छाशक्ती ‘पुस्तकदोस्ती’ अभियानाला बळ देऊ शकेल.
शिक्षणाचा उद्देश केवळ व्यक्तिपुरताच मर्यादित नसून, समाजाभिमुख ज्ञान देणे आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आम्ही केवळ परीक्षार्थी घडवित आहोत. परीक्षा झाली की विद्यार्थ्यांचा पुस्तकाशी संबंध संपुष्टात येतो. हा ऋणानुबंध कायम राहण्यासाठी सावरकर गुरुजींची प्रेरणा आशादायी वाटते.
संकलन व संपादन - नीलेश डाखोरे