esakal | महामेट्रोची कमाल! सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनला `प्लॅटिनम' दर्जा; इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

Sitabuldi metro station got platinum level reward

सीताबर्डी मेट्रो स्टेशन शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या स्टेशनपैकी आहे. पाच मजली या स्टेशनवरील पहिल्या माळ्यावर तिकीट काउंटर असून दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर मेट्रोसाठी प्लॅटफॉर्म आहेत

महामेट्रोची कमाल! सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनला `प्लॅटिनम' दर्जा; इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून सन्मान

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः आतापर्यंत अनेक मैलाचे दगड गाठणाऱ्या नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल संस्थेने प्लॅटिनम दर्जा बहाल केला. इंग्रजीतील एल आकाराच्या या स्टेशनचे बांधकाम पर्यावरणाला अनुसरून करण्यात आले. त्यामुळे या स्टेशनला प्लॅटिनम दर्जा देण्यात आला.

सीताबर्डी मेट्रो स्टेशन शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या स्टेशनपैकी आहे. पाच मजली या स्टेशनवरील पहिल्या माळ्यावर तिकीट काउंटर असून दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर मेट्रोसाठी प्लॅटफॉर्म आहेत. या स्टेशनवरील ऑपरेशन सेंटरमधून मेट्रो ट्रेनचे नियंत्रण केले जाते. पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण मेट्रो मार्गासाठी सीताबर्डी स्टेशन महत्त्वाचे आहे. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

सीताबर्डी स्टेशन पर्यावरणपूरक तयार करण्यात आले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी ही संकल्पना अंमलात आणली. महामेट्रोने सर्वच स्टेशन पर्यावरणाची हानी होणार नाही, या उद्देशाने तयार केले. यापूर्वी वर्धा मार्गावरील खापरी, न्यू एयरपोर्ट, एयरपोर्ट साउथ, एयरपोर्ट, जयप्रकाश नगर, राहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन व हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर, बंसीनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इंस्टीटयुट ऑफ इंजिनिअर्स, झासी राणी चौक मेट्रो स्थानकांना आयजीबीसीकडून प्लॅटिनम दर्जा प्राप्त झाला आहे. 

नुकतेच मेट्रो भवनला देखील आयजीबीसीने प्लॅटिनम दर्जा दिला. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर मोठ्या प्रमाणात केलेला सौर ऊर्जेचा वापर होत आहे. २०० किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जाप्रणाली इथे बसविण्यात आली असून यातून वर्षाला २.७ लाख घटक ऊर्जा निर्मित होईल. या इमारतीच्या एकूण आवश्यकतेपैकी ५० टक्के ऊर्जा सौर प्रणालीच्या माध्यमातून मिळत आहे.

ठळक बातमी - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाची पडलीय 'भूल'?

याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था असल्याने स्टेशनच्या छतावर आणि परिसरात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा १०० टक्के पुनर्वापर होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सोयी सुविधा प्रवाशांसाठी आहेत. या स्टेशनवरून रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानक जोडण्यात आले आहे. स्टेशन परिसरात फीडर बस सेवा, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, पार्किंग, सायकल पार्किंग आदी सुविधा करण्यात आल्या आहे.

संपादन - अथर्व महांकाळ