बिग ब्रेकिंग: भारतीय सैन्यात असलेल्या जवानाचा कुलू मनालीत दुर्घटनेत मृत्यू; पिंपळखुटा गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राज इंगळे 
Thursday, 24 December 2020

श्री. दहीकर यांच्या मृत्यूनंतर आवश्‍यक ते सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसांत त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने आणले जाणार आहे

अचलपूर (जि. अमरावती) ः भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील एका जवानाचा कुलूमनाली परिसरातील पॉइंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ते अचलपूर तालुक्‍यातील पिंपळखुटा येथील रहिवासी होते.

जाणून घ्या - सोन्याचे भाव माहिती आहे का? तब्बल इतक्या रुपयांची झाली घसरण

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कैलास कालू दहीकर (वय 27) हे जवान भारतीय सैन्यात 15 बिहारमध्ये कार्यरत होते. बुधवारी (ता. 23) रात्री हिमाचल प्रदेशातील कुलूमनाली येथे कर्तव्यावर असताना आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. तेथील कडाक्‍याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी रात्री केरोसीनवर चालणारी शेगडी लावली होती. ते झोपेत असताना आग लागून होरपळून त्यांचा मृत्यू झाला. 

श्री. दहीकर यांच्या मृत्यूनंतर आवश्‍यक ते सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसांत त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने आणले जाणार आहे. त्यानंतर सैन्याच्या वाहनातून पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली.

क्लिक करा - हुंडाबळी : ‘माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा’ अशी चिठ्ठी लिहित महिला डॉक्टरने घेतला गळफास

या घटनेने पिंपळखुटा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍च्यात पत्नी बबली कैलास दहीकर, दीड वर्षीय मुलगी चैताली कैलास दहीकर, आई मंगराय कालू दहीकर, वडील कालू दहीकर, भाऊ केवल कालू दहीकर, असा परिवार आहे. 2013 मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते. विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. दरम्यान, माजी आमदार केवलराम काळे गावात दाखल झाले असून प्रशासकीय पातळीवर हालचाल करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soldier from amravati district is no more in manali breaking news