पडीत रेल्वे कोर्टरमध्ये मद्यपी आणि चोरांचा धुमाकूळ; दारं-खिडक्या चोरीला; रहिवाशांमध्ये दहशत

योगेश बरवड 
Sunday, 10 January 2021

पंजाबी लाइन ही रेल्वे कर्मचाऱ्यांची फार जुनी वसाहत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येते. कधीकाळी दिमाखात उभी असणाऱ्या या वसाहतीवर काळानुरूप अवकळा आली.

नागपूर ः पंजाबी लाइन रेल्वे क्वॉर्टर परिसरात चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. पडीत क्वॉर्टरची दारे-खिडक्या चोरीला जाण्याचा क्रम सातत्याने सुरू आहे. या भागात गांजा ओढणारे आणि मद्यपींचा वावर असतो. या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पण, भीतीपोटी कुणीही बोलण्यास तयार नाही.

पंजाबी लाइन ही रेल्वे कर्मचाऱ्यांची फार जुनी वसाहत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येते. कधीकाळी दिमाखात उभी असणाऱ्या या वसाहतीवर काळानुरूप अवकळा आली. योग्य देखरेखीअभावी कर्मचाऱ्यांना येथील क्वॉर्टरमध्ये राहणे पचनी पडले नाही. परिणामी एक एक करीत अनेक क्वॉर्टर रिकामे झाले. 

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

आजघडीला ४० ते ५० क्वॉर्टर रिकामे पडले आहे. भुरट्या चोरांसाठी ही आयती संधी ठरली. सुरक्षेत्या दृष्टीने लावण्यात आलेले लोखंडी दारे-खिडक्या चोरीला जाऊ लागले. अनेक क्वार्टर दारे खिडक्यांअभावी उभ्या असून त्यांना खंडरचे स्वरूप आले आहे. कुणीही या भागात धाडस करीत नसल्याने दारूडे आणि गांजा पिणाऱ्यांनी या भागाला आपला अड्डा बलविले आहे. या भागात त्यांचेच साम्राज्य असते. परिणामी भर दिवसाही धडकी भरविणारी परिस्थती या ठिकाणी निर्माण झाली आहे.

प्रेमियुगुलांचा धुडगूस

निर्जनस्थळ असल्याने प्रेमियुगुलाचा या भागात नेहमीच धुडगूस सुरू असतो. कोणतीही रोकटोक नसल्याने बरेचदा सर्वसामान्यांना लाजवेल अशी त्यांची वर्तणूक असते. पण, हा प्रकार कधीही मोठ्या घटनेसाठी कारणीभूत ठरू शकतो.

जाणून घ्या - तब्बल १५ वर्षांनी झालं तिसऱ्या पाहुण्याचं आगमन अन् रात्री एका क्षणात कोसळला दुःखाचा डोंगर 

आरपीएफ करतेय तरी काय?

रेल्वेच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची आहे. चोरीच्या घटना घडूनही त्याकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजीची भावना आहे. कुणीही उघडपणे या परिस्थितीवर बोलण्यास तयार नसले तरी आरपीएफ करतेय तरी काय, त्यांचा उपयोग काय, असा सवाल स्थानिक रहिवाशांनी दबक्या आवाजात उपस्थित केला.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves heft doors and windows in Railway quarters in bad condition Latest Story