बिल्डरची रेकी करून चोरट्यांनी केली तब्बल २१ लाखांची चोरी; नागपूरच्या मानेवाडातील घटना 

अनिल कांबळे 
Thursday, 26 November 2020

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप नितनवरे हे बिल्डर आहेत आणि घरीच तळमाळ्यावर ‘सम्राट’ जीमही चालवतात. बुधवारी दुपारी अडीच ते चार वाजता दरम्यान ते काही कामाने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते.

नागपूर ः हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत अज्ञात चोरांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख १७ लाख रुपयांवर हातसाफ केला. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे. केवळ दीड तासात चोरांनी ही चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी आकाशनगर, मानेवाडा निवासी संदीप श्रीराम नितनवरे (४०) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप नितनवरे हे बिल्डर आहेत आणि घरीच तळमाळ्यावर ‘सम्राट’ जीमही चालवतात. बुधवारी दुपारी अडीच ते चार वाजता दरम्यान ते काही कामाने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. हिच संधी साधून अज्ञात चोरांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून दुसऱ्या माळ्यावरील त्यांच्या घरात प्रवेश केला. 

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

कपाटातील १०.५० तोळे सोन्याचे दागिने व रोख १७ लाख असा एकूण २१ लाख रुपयांच्या मुद्देमालावर हातसाफ केला आणि पसार झाले. काम आटोपून नितनवरे घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. 

हुडकेश्वरचे ठाणेदार प्रतापराव भोसले पथकासह घटनास्थळावर पोहोचले. संदीप व्यवसायाने बिल्डर असल्यामुळे मजुरांना कामाचे पैसे देण्यासाठी त्यांनी घरी इतकी मोठी रक्कम ठेवली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण? 

चोरट्यांनी केली रेकी

चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी घराची रेकी करून ठेवली होती.त्यामुळे त्यांनी एवढ्या सहजतेने चोरी करता आली. तसेच चोरट्यांनी एवढ्या शिताफीने पळही काढता आला. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत.त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

संपादन- अथर्व महांकाळ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieves theft 21 lac rupees from builder house in Nagpur