तोबा, तोबा... बॅंकेत गर्दी पेलता पेलेना!

पाटणसावंगी : "सोशल डिस्टन्सिंग' झुगारून बॅंकेत झालेली गर्दी.
पाटणसावंगी : "सोशल डिस्टन्सिंग' झुगारून बॅंकेत झालेली गर्दी.

नागपूर : कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी केंद्र शासनाकडून संचारबंदी लागू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात "लॉकडाउन' करण्याची घोषणा केली. इतकी गंभीर परिस्थिती असतानासुद्धा जिल्ह्यात नागरिकांकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.

सूचनांना केराची टोपली
पाटणसावंगी :  शहरात मात्र आज अनेक नागरिक वाहनांनी, पायी फिरताना आढळून आले. तसेच बॅंकेमध्ये पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. "सोशल डिस्टन्स' कोठेही पाळण्यात येत नव्हते. नागरिक मनाला वाटेल त्याप्रमाणे रस्त्यावर ये-जा करताना आढळून आले. जणूकाही लॉकडाउन उघडल्याचा अनुभव आज आला. बॅंकेमध्ये सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. नागरिक एकापाठोपाठ एक उभे आहेत. यामुळे "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रविवारी (ता. पाच) व सोमवारी (ता. सहा) बॅंकांना सुटी होती. आज मात्र ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. बॅंकेनेही या ग्राहकांना कोरोनाबाबत काळजी घेण्यास सांगितले नसल्याचे चित्र होते. पाटणसावंगीतील काही नागरिकांकडून स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता तोंडाला मास्क न लावता गावातून दिवसरात्र कोणाचीही भीती न बाळगता, मनसोक्त फिरत आहेत. दरम्यान, परिसरातील ग्रामपंचायती व संबंधित विभागाने आपल्यास्तरावरून वारंवार दवंडी, लाउडस्पीकर व इतर प्रसारमाध्यमाव्दारे सूचना दिल्या आहेत. तालुक्‍यातील गावे व लोकसंख्येच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने, रिकामटेकड्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.

बॅंक व्यवस्थापक नाहीत गंभीर
पारशिवनी : येथील राष्ट्रीयीकृत बॅंकेने मात्र लॉकडाउनचा फज्जा उडविल्याचे दिसत आहे. बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेच्या प्रबंधकांनी नागरिक जमा होणार नाही, याकरिता कुठलीही उपाययोजना न केल्याने एकाच ठिकाणी नागरिकांचा घोळका बॅंकेसमोर जमा होत आहे. जमावबंदीचा पालन न करता कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. शासनस्तरावर जमावबंदी होणार नाही याकरिता कडक निर्देश असतानादेखील बॅंकेसमोर ग्राहकांची गर्दी दिसून येते. एकीकडे केंद्र सरकार, राज्य शासन कोरोना आजाराविषयी गंभीर असताना मात्र बॅंक व्यवस्थापक सरकारच्या निर्णयावर नाखुश दिसत आहेत. लॉकडाउनमध्ये अशी गर्दी दिसत असल्यामुळे पुढे धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्यास गर्दीवर अंकुश लावता येऊ शकतो, अन्यथा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

आदेशाला केराची टोपली
मौदा : येथील बॅंक ऑफ इंडियासमोर ग्राहकांची गर्दी राहत असून आज सोशल डिस्टनसिंग तर कुठेही आढळली नाही. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांना पत्र देण्यात आले आहेत. परंतु, या नॅशनल बॅंक सोशल डिस्टन्सिंग आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. बॅंकेत गार्डची व्यवस्थाही नाही.बॅंक ऑफ इंडियामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची खाती आहेत. एकच काउंटर असल्यामुळे येथे नेहमी गर्दी होत असते. परंतु, आज कडक ऊन असल्यामुळे लोकांना उन्हात उभे राहून पैसे काढण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. बॅंकेने कोणतीही ग्राहकांची सोय केली नाही. सोशल डिस्टन्सिंगकरिता एक मीटर अंतरावर गोल आखून ठेवण्यात आले असते, तर एवढी गर्दी पाहायला मिळाली नसती.

पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे !
संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल. मास्क न बांधता नागरिकांनी गावात फिरू नये, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.
-निशांत फुलेकर, सहायक पोलिस निरीक्षक, पाटणसावंगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com