नागपुरात दिव्यांगाच्या ट्रायसिकल धुळखात; तब्बल दोन वर्षांपासून वाटपच नाही; अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष 

निलेश डोये 
Sunday, 10 January 2021

हिंगणा पंचायत समिती अंतर्गत तर तब्बल २५ ट्रायसिकल्स धुळखात पडून असल्याचे सभापती उज्वला बोढारे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. 

नागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागा मार्फत दिव्यांगांना ट्रायसिकल देण्यात येतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या ट्रायसिकल पंचायत समितीत धुळखात पडून आहेत. महिला बाल कल्याण सभापती उज्‍ज्वा बोढारे यांनी याप्रकरणाकडे लक्ष वेधले.

हिंगणा पंचायत समिती अंतर्गत तर तब्बल २५ ट्रायसिकल्स धुळखात पडून असल्याचे सभापती उज्वला बोढारे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. 

जाणून घ्या - तब्बल १५ वर्षांनी झालं तिसऱ्या पाहुण्याचं आगमन अन् रात्री एका क्षणात कोसळला दुःखाचा डोंगर 

जिल्ह्यातील तेराही पंचायत समितीचा आढावा घेतला असता वर्ष २०१८-१९ व २०१९-२० या काळात ९७ मोटराईज्ड ट्रायसिकल दिव्यांगांना वाटपच करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. वित्त सभापती भारती पाटील यांनी हा उचलून धरला.

 ट्रायसिकलसाठी लाभार्थ्यांचे अर्जच आले नाही, तर त्या खरेदी का केल्यात, असा सवाल उपस्थित करण्यात आला. भाजपचा सत्ता असताना ही खरेदी झाली होती. ट्रायसिकल खरेदीत गैरव्यवहार झाला असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजते. विद्यमान समाज कल्याण सभापती नेमावली माटे यांनी ही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर अप्रत्यक्षरित्या ताशेरे ओढण्यात आले. 

दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मोटराइज्ड ट्रायसिकल पंचायत समित्यांमध्ये धुळखात पडून आहे. त्यांच्या बॅटऱ्या खराब होत असल्याचे उज्ज्ला बोढारे यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले. ट्रायसिकल्सच्या बॅटरी रिपेअर करून लाभार्थ्यांना त्याचे वितरण करायला हवे. ट्रायसिकल्स वाटप न होता खराब झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

जाणून घ्या - "वाचवा होss लेकरांना वाचवा" जिवाच्या आकांतानं ओरडत होत्या माता; अखेर छकुल्यांच्या डोक्यावर पदर टाकून केला आक्रोश  

अर्जदारांची यादी मोठी असते. त्यामुळे यादीतील उर्वरित लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात येतील. ते करताना नियमांचे पालन करण्यात येईल. यावर कुणालाही आपले नाव लिहिता येणार नाही.
रश्मी बर्वे, 
अध्यक्ष, जि.प. 
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tricycles of handicapped people are not given to the in Nagpur